पोटातील वाईट जीवाणू करतात मेंदूच्या कार्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 08:06 PM2022-04-05T20:06:33+5:302022-04-05T20:07:16+5:30
Nagpur News आपल्या पोटातील वाईट जिवाणू हे आपल्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकतात असे वास्तव एका अभ्यासातून पुढे आले आहे.
नागपूर : आपल्या पोटात १०० ‘ट्रिलियन’हून अधिक जीवाणू राहतात. यात चांगले आणि वाईटही जीवाणू असतात. वाईट जीवाणूंचा आपल्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होतात. एकूणच आतड्यांचे आरोग्य राखले तर विविध रोग रोखण्यास मदत होते. २१० लोकांच्या शौचातील नमुन्यांमधील जीवाणूंची ‘डीएनए’ तपासणी करून करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती पुढे आले असल्याचे ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (सीम्स) संचालक डॉ. राजपाल सिंग कश्यप यांनी सांगितले.
ही माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ‘सीम्स’चे संचालक डॉ. लोकेंद्र सिंग उपस्थित होते. आतडे-मेंदूमधील अक्षरेखावर ‘सीम्स’ने हे संशोधन केले असून, याचे तीन शोधनिबंध प्रकाशित केल्याचे सांगत डॉ. कश्यप म्हणाले, मेंदूचे आजार समजून घेण्यासाठी पोटातील आतड्यांवर अभ्यास करणे सुरू केले. हा अभ्यास करणारी ‘सीम्स’ भारतातील पहिली संस्था आहे. पोटातील जीवाणू जी प्रथिने तयार करतात त्यांचा केंद्रीय चेतासंस्थेशी संबंध असतो. या जीवाणूंमुळे संप्रेरके व मेंदूतील संवाहक रसायने तयार होतात. आपल्या पोटात असलेल्या जीवाणूंच्या ‘मायक्रोबायोम’मुळे स्वमग्नता, नैराश्य असे आजार जडू शकतात. याशिवाय, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणाचाच नाही, तर कॅन्सरचाही धोका ओळखू शकतो.
-ग्रामीणमधील लोकांच्या पोटात चांगल्या जीवाणूंची संख्या अधिक
डॉ. कश्यप म्हणाले, मेळघाटातील ४० टक्के लोकांचे तर नागपूर शहरातील ६० टक्के लोकांच्या शौचातील नमुने तपासण्यात आले. यात शहरातील लोकांच्या नमुन्यात वाईट जीवाणूंची संख्या अधिक होती, तर ग्रामीणमधील लोकांच्या नमुन्यात चांगल्या जीवाणूंची संख्या अधिक होती. यात सुधारणा करण्यासाठी आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे व जास्तीत जास्त ‘फायबर’युक्त आहार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
-भविष्यातील आजाराला ठेवता येईल दूर
डॉ. कश्यप म्हणाले, या अभ्यासातून आतड्यांतील सूक्ष्मजीव व ‘इम्युनोमेटाबॉलिक’चे ‘बायोमार्कर’ ओळखता येतात. यामुळे उपाययोजना करून भविष्यातील संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाला दूर ठेवता येईल. विशेषत: ‘प्री-डायबिटीस’ची प्रारंभिक चिन्हे ओळखण्यास मदत होईल. या अभ्यासात डॉ. चांडक, डॉ. काबरा, डॉ. बाहेती व डॉ. तान्या मोनाघन आदींचा समावेश होता.
-मध्यभारतातील पहिली ‘बायो बँकिंग’
डॉ. लोकेंद्र सिंग म्हणाले, ‘सीम्स’च्या संशाधेनाने ‘न्युरोलॉजिकल डिसऑर्डर’च्या रुग्णांचे घेतलेल्या शौचातील नमुन्यातील ‘डीएनए’ची ‘बायो बँकिंग’स्थापना केली आहे. मध्यभारतातील ही पहिली बँक आहे. यामुळे आम्हाल विविध मेंदूचे आजार समजण्यास मदत होईल.