गर्भवती महिलांसह पोटातील बाळावरही रंगांचे वाईट परिणाम, डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केली भीती
By सुमेध वाघमार | Published: March 23, 2024 07:13 PM2024-03-23T19:13:14+5:302024-03-23T19:14:14+5:30
Nagpur News: वाईट प्रवृत्तीवर मात करणारा, शत्रूलाही मित्र बनविणारा, कटूता संपविणारा, रंगाची उधळण करून सर्वांना एकत्र आणणारा सण म्हणजे होळी. परंतु रसायनयुक्त रंग खेळल्यास गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो, असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांचे म्हणणे आहे.
- सुमेध वाघमारे
नागपूर - वाईट प्रवृत्तीवर मात करणारा, शत्रूलाही मित्र बनविणारा, कटूता संपविणारा, रंगाची उधळण करून सर्वांना एकत्र आणणारा सण म्हणजे होळी. परंतु रसायनयुक्त रंग खेळल्यास गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो, असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांचे म्हणणे आहे.
लाल रंगात ‘मर्क्युरी सल्फेट’
डॉ. गावंडे यांनी सांगितले, धुळवडच्या दिवशी बहुतांश प्रमाणात लाल रंगाचा वापर होतो. हा रंग ‘मर्क्युरी सल्फेट’पासून तयार होतो. यामुळे त्वचेचे आजार, कर्करोग होऊ शकतो. काही प्रकरणांत तर अर्धांगवायूचा झटकाही आल्याचे पुढे आले आहे.
जांभळ्या रंगात ‘क्रोमिअम’ आणि ‘ब्रोमाइट’
जांभळा रंग ‘क्रोमिअम’ आणि ‘ब्रोमाइट’पासून तयार होतो. हिरवा रंग ‘कॉपर सल्फेट’पासून तयार केला जातो. तो वापरल्यास त्वचेची जळजळ होते. डोळ्यात रंग गेल्यास ते निकामी होण्याची भिती असते. अॅलर्जी होऊन डोळे लाल होतात.
काळ्या रंगात ‘लेड आॅक्साइड’
काळा रंग हा ‘लेड आॅक्साइड’ पासून तयार होतो. म्हणजे, रंग कुठलाही घ्या, त्यात जीवघेणे रासायनिक पदार्थ राहतातच. मुले जेव्हा रंगउधळण करतात, तेव्हा त्यांच्या नाका-तोंडात, कानात, डोळ्यात रंग जातोच. काळा रंग एवढा घातक आहे की, त्यामुळे त्वचेचे आजार तर होतातच, पण किडनीविकारही होतात.
बाळ गतिमंद जन्माला येऊ शकते
काळ्या रंगातील रसायनामुळे जन्माला येणारे बाळ गतिमंद राहू शकते. यामुळे गर्भवतींनी विशेष काळजी घ्यायला हवी. या शिवाय, रंग लावताना बचावासाठी अनेकजण सैरावैरा धावतात, झटापट होते. त्यातून पढण्याचा, अपघाताचा धोका संभावतो.
रंगासाठी पळसाची फुले, हळद, मेहंदीचा करा वापर
होळी नैसर्गिक रंगांचा वापर करूनच खेळा. पळसाची फुले, हळद, मेहंदी, बीट रूटचा वापर करून पिवळा रंग तयार करता येतो. याशिवाय हिरवा रंग तयार करयचा असल्यास कोथींबीर, पालक, पुदीना, टोमॅटोची पाने याची पेस्ट करा. ती पाण्यात टाका व दोन चमचे मेंदी टाकून एक लिटर पाण्यात उकळून घ्या. यातूनच हिरवा रंग तयार होतो. होळी वाईटावर मात करणारा सण आहे. तो विकार विकत घेणारा सण नाही, असेही डॉ. गावंडे म्हणाले.