त्यांचे वाहन व रस्ते ठरले यमदूत, दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू
By योगेश पांडे | Published: July 11, 2024 04:03 PM2024-07-11T16:03:03+5:302024-07-11T16:05:09+5:30
Nagpur : नागपुरमध्ये दोन नागरिकांचा वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी घसरून मृत्यू
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागोजागी सुरू असलेल्या विकासकामांमुळे माती साचल्याने सिमेंट रस्ते निसरडे झाले आहे. अशा रस्त्यांवरून जाताना गाडी घसरण्याचा मोठा धोका असतो. नागपुरातील दोन नागरिकांचा वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी घसरून पडल्याने मृत्यू झाला. त्यांच्यासाठी त्यांचे वाहनच यमदूत ठरले असले तरी रस्त्यांचा निसरडेपणा हेदेखील एक कारण मानले जात आहे.
पहिला अपघात अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. प्रदीप किरण दिंडमुढे (४५, विश्वकर्मा नगर) हे त्यांच्या दुचाकीने कांबळे चौकातून जात होते. पाऊस सुरू असल्याने रस्ता निसरडा झाला होता व त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला व ते गंभीर जखमी झाला. त्यांना सक्करदरा येथील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा १० जुलै रोजी मृत्यू झाला. निखील पसारे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शोहेब बरकाती शेख (२६, निराला सोसायटी, सक्करदरा) हे ९ जुलै रोजी साडेसात वाजता सक्करदरा उड्डाणपुलाजवळून जात होते. त्यांची दुचाकी स्लीप झाली व ते खाली पडले. त्यांना जखमी अवस्थेत अगोदर मेडिकल व नंतर खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. १० जुलै रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सक्करदरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विकासकामांमुळे हजारो वाहनचालकांना धोका
शहरात जागोजागी रस्त्यांची तसेच पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी खाजगी बिल्डर्सचे डम्पर मातीचा मलबा घेऊन जाताना दिसतात. त्यांच्या टायर्सला लागलेली मातीची ठिगळे रस्त्यावर पडतात व सिमेंट रस्ते निसरडे होत असल्याचे चित्र आहे. त्यावरून जाताना दुचाकीचालक घसरून पडतात. शहरात अशोक चौक, जगनाडे चौक, भेंडे ले आऊट, प्रतापनगर रिंग रोड, ऑरेंज स्ट्रीट येथे हे चित्र दिसून येत आहे. मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याचा फटका दुचाकीस्वारांना बसतो आहे.