आजपासून पुढचे चार दिवस अवकाळीचा जाेर अधिक
By निशांत वानखेडे | Published: May 11, 2024 04:21 PM2024-05-11T16:21:44+5:302024-05-11T16:22:13+5:30
पुन्हा आठवडाभर राहिल पावसाचे सावट : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही प्रभाव
नागपूर : गुरुवारच्या धुमाकुळानंतर दाेन दिवस शांत राहिलेला अवकाळीचा पाऊस पुन्हा सक्रिय हाेण्याची स्थिती आहे. विदर्भात शनिवारपासून ते पुढचे चार दिवस १४ मे पर्यंत वादळ व विजांसह पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने दिला आहे. त्यापुढचे चार दिवसही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
उत्तरप्रदेच्या मध्य क्षेत्रात समुद्र सपाटीपासून दीड किमी उंचीवर चक्रिया वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. या चक्रिय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसामच्या हाॅफलाॅंग ते सिल्चरपर्यंत ९०० मीटर उंचावर पूर्व-पश्चिम पसरलेला हवेचा कमी दाबाचा आस तयार झाला आहे. दाेन्ही समुद्रातून हाेणारा बाष्प पुरवठा आणि मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत तयार झालेली वारा खंडितता स्थिती यामुळे महाराष्ट्रात अवकाळी व गारपीटीचे वातावरण तयार झाले आहे.
११ मे पासून १४ मे पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खांदेश व पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जाेर अधिक राहणार आहे. नागपूरसह गडचिराेली, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह पाऊस अधिक सक्रिय असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अवकाळीपासून अलिप्त असलेला मुंबई, उपनगरसह संपूर्ण कोकणातील सात जिल्ह्यातही १६ मेपर्यंत ढगाळ वातावरण राहून अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.
पारा चढला पण उष्णता कमी
दाेन दिवसाची उसंत घेतल्यामुळे कमाल तापमानात थाेडी वाढ झाली आहे. गाेंदियात ७ अंश, ब्रम्हपुरीत ६.८ अंश, वर्धा ५.४ अंश वाढले. नागपुरात तापमान ३६.६ अंशावर वाढले. मात्र अद्याप सरासरीपेक्षा ५.८ अंशाने खाली आहे. नागपूरसह पावसाळी सावट असलेल्या जिल्ह्यात उन्हाची तीव्रता घटली असून उष्णताेसुद्धा कमी झाली आहे. अकाेला, अमरावती, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात पारा ४० पेक्षा अधिक आहे.