आईच्या मारहाणीचा सूड उगविण्यासाठी केला बादलचा गेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:33 AM2019-04-26T00:33:08+5:302019-04-26T00:55:24+5:30
बुधवारी रात्री बैद्यनाथ चौकात झालेल्या कुख्यात गुंड बादल राजू गजभिये(वय २७)च्या हत्याकांडातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळविले. आईला केलेली मारहाण आणि बहिणीला वारंवार होणारा त्रास यामुळे बादलच्या भावाच्या साळ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कुख्यात बादलला संपविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याची माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकारांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी रात्री बैद्यनाथ चौकात झालेल्या कुख्यात गुंड बादल राजू गजभिये(वय २७)च्या हत्याकांडातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळविले. आईला केलेली मारहाण आणि बहिणीला वारंवार होणारा त्रास यामुळे बादलच्या भावाच्या साळ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कुख्यात बादलला संपविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याची माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकारांना दिली. यावेळी इमामवाड्याचे ठाणेदार मुकुंद साळुंके हजर होते.
नीलेश विनोद मेश्राम (वय २२), सन्नी भाऊराव बागडे (वय २३), उद्देश शालिक मेश्राम (वय २३), आदर्श ऊर्फ अॅक्शन अशोक जारोडे (वय २०) आणि रितिक ऊर्फ काल्या विक्की खोब्रागडे (वय १९), अशी सर्व आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण रामबाग, इमामवाडा परिसरात राहतात. नीलेश या हत्याकांडाचा सूत्रधार असून, तो बादलचा भाऊ आकाश (वय २६) याचा साळा आहे. आकाशने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे बादल चिडून होता. बादलच्या पत्नीला पाच महिन्यांचे बाळ आहे. उन्हाचे दिवस असूनही तो कधी कूलर बंद करायचा तर कधी पाणी बंद करून वहिनीला त्रास देत होता. बहीण ही बाब नीलेशला सांगायची. नीलेशने बादलला समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याला मारहाण केली होती. दुसरे म्हणजे, १० एप्रिलला नीलेशच्या आईने बादलला समजाविण्याचा प्रयत्न केला. तू तुझ्या नवबाळंतीण वहिनीला त्रास देऊन काय मिळवतो, अशी त्याला विचारणा केली असता बादलने नीलेशच्या आईलाही मारहाण केली होती. त्या दिवशीच नीलेशने बादलची हत्या करण्याचे पक्के केले होते. बाजूला राहणारा नीलेशचा खास मित्र सन्नी यालाही बादल मारायचा, त्रास द्यायचा. त्यामुळे सन्नीही बादलचा हिशेब चुकविण्याच्या मानसिकतेत होता. नीलेश आणि सन्नीने उद्देश तसेच आदर्शला आपल्या कटात सहभागी करून घेतले होते. नीलेशने तळेगावमधून एक तलवारही विकत आणली होती. ते संधीची वाट बघत होते. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास बादल त्याचा मित्र सनी मलखनसोबत बैद्यनाथ चौकात चहाटपरीवर गेले होते. त्याच्या मागावर असलेला नीलेश आणि सन्नीने लगेच त्यांना पाहून घराकडे धाव घेतली. घरून तलवार तसेच अन्य शस्त्र, मिरची पावडर आणि उद्देश तसेच आदर्शला सोबत घेतले. हे चौघे बैद्यनाथ चौक, कामगार भवनच्या मागे सिमेंट रोडवर आले असता त्यांना आरोपी रितिक दिसला. त्यांनी त्याला बादलबद्दल विचारले असता त्याने बादल अजंता हॉलकडे गेल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व आरोपी बाजूला उभ्या असलेल्या एका ऑटोत बसून बादलची वाट बघू लागले. जसा बादल आणि सन्नी त्यांना दिसला त्याचक्षणी त्यांनी बादलवर झडप घालून त्याला कोणतीही संधी न देता त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले. त्यानंतर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. एवढेच नव्हे तर आरोपी सन्नी आणि रितिकने बादलला दगडानेही ठेचले. त्यानंतर सर्व आरोपी पळून गेले.
पोलिसांची भागमभाग
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. ऑक्टोबर २०१५ मध्ये बादलचे वडील राजू यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी बादलने चुनाभट्टी बाजारात २०१६ मध्ये सौरभ अलोणी याच्यावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेचा बदला म्हणून बादलची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तोच धागा धरून इमामवाडा पोलीस इकडेतिकडे धावपळ करीत होते. मात्र, बादलचा गेम प्रतिस्पर्धी टोळीने नव्हे तर त्याच्या नात्यातीलच आरोपीने केल्याची माहिती कळाल्याने अखेर गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी नीलेशसह पाचही आरोपींना अटक केली.