कैदी पलायनात ‘बदलापूर’ इफेक्ट
By admin | Published: April 6, 2015 02:20 AM2015-04-06T02:20:36+5:302015-04-06T02:20:36+5:30
कारागृहातून पळालेल्या कैद्यांनी बदलापूर सिनेमा बघून सुरुंग लावला होता. खास सिनेमा बघण्यासाठी सात महिन्यापूर्वी राजा
हॉलिवूड चित्रपटातूनही घेतली प्रेरणा : बॅरॅकमध्ये लावली होती एलसीडी
जगदीश जोशी ल्ल नागपूर
कारागृहातून पळालेल्या कैद्यांनी बदलापूर सिनेमा बघून सुरुंग लावला होता. खास सिनेमा बघण्यासाठी सात महिन्यापूर्वी राजा गौसच्या माध्यमातून बॅरॅक-६ मध्ये एलसीडी पोहचविण्यात आली होती. १८ हजारांची एलसीडी बॅरॅकमध्ये आणण्यासाठी राजाने २५ हजार रुपयांची लाच दिल्याची सूत्रांची माहिती आहे. या दिशेने सखोल चौकशी केल्यास कारागृहात तैनात आणखी काही अधिकाऱ्यांचे कारनामे समोर येऊ शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सूत्रांच्या सांगण्यानुसार याप्रकरणाचा सूत्रधार राजा गौस आहे. त्याच्याजवळ कोट्यवधीची संपत्ती आहे. त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली, पंजाब व हरियाणा येथे दरोडे टाकले आहेत. यातून मिळविलेली संपत्ती आपल्या खास माणसांकडे लपविली आहे. नागपूर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर राजाने कारागृहातून सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, दरोडा, लुटमारी याप्रकरणी १८ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे राजाची सहज सुटका होणे कठीण आहे. राजाने त्याचा खास सत्येंद्र गुप्ता याला बाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सत्येंद्र, शोएब ऊर्फ शिबू व बिसेन उईकेला जेलच्या बाहेर पाठविण्याची योजना आखली होती. हे तिघेही बॅरॅक नंबर -६ मध्ये होते. या बॅरॅकमध्ये बऱ्याच वर्षापासून छोटा टीव्ही होता. राजा जेलच्या अधिकाऱ्यांशी बॅरॅकमध्ये एलसीडी लावण्यासाठी बोलला होता. अधिकाऱ्यांनी या बदल्यात २० ते २५ हजारांची लाच मागितली होती. राजा त्यासाठी तयार झाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून बॅरॅक ६ मध्ये एलसीडी पोहचविण्यात आली.
एलसीडीमध्ये मेमरी कार्डच्या माध्यमातून सिनेमा बघितला जाऊ शकतो. सत्येंद्र व शिबू दोन महिन्यापासून एक इंग्लिश सिनेमा बघत होते. या सिनेमात जेल तोडण्याचा एक सिन आहे. त्याचबरोबर बदलापूर सिनेमाही ते बघत होते. यातही जेल तोडण्याची घटना आहे. सत्येंद्र व शिबू यांनी जेलमधून पळण्यापूर्वी ८ ते १० वेळा बदलापूर सिनेमा बघितला होता.
बॅरॅकमध्ये राहणाऱ्या चार-पाच कैद्यांना वॉर्डन वॉचमॅन नियुक्त करण्यात येते. यांच्यावर बॅरॅकची जबाबदारी असते. प्रत्येक बॅरॅक चार भागात असते, त्याला कमान म्हणतात. वॉर्डन वॉचमॅन हे जास्त करून चौथ्या कमानमध्ये राहतात. कारण चौथ्या कमानीत गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना ठेवण्यात येते. राजाचे तीनही साथीदार चौथ्या कमानमध्ये राहत होते. काही दिवसापासून वॉर्डन वॉचमन चौथ्या कमानमध्ये राहत नव्हते. वॉर्डन वॉचमनवर लक्ष ठेवण्यासाठी सत्येंद्र व शिबू यांनी बिसेन उईकेला तीन महिन्यापूर्वी कमानमध्ये पाठविले होते. येथून तो वॉर्डन वॉचमनच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवून होता. (प्रतिनिधी)
दोन वर्षापासून कारागृहाचे निरीक्षण बंद
कारागृहाच्या छोट्या गोलमध्ये शिक्षा सुनावलेले व मोठ्या गोलमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेले कैदी ठेवले जातात. दोन्ही गोलमध्ये आठवड्यातून दोनवेळा अधिकारी निरीक्षण करतात. मोठ्या गोलमध्ये मंगळवार व शुक्रवार तर छोट्या गोलमध्ये सोमवार, बुधवारचा दिवस निश्चित आहे. आठवड्यातून एक दिवस कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो. तर दुसऱ्या दिवशी कैद्यांची गणना करण्यात येते, त्यांची वागणूक, स्वच्छता व आजाराची माहिती घेण्यात येते. मात्र दोन वर्षापासून कारागृहाचे निरीक्षण बंद आहे. बॅरॅकमध्ये काय सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी कुणालाही वेळ नाही.
पळण्यासाठी चादरीच्या दोरीचा वापर
कारागृहाच्या कैद्यांना चादरीची दोरी बनविण्याची कला अवगत आहे. ही दोही लोखंडाच्या तारापेक्षा मजबूत असते. या दोरीचा कैद्यांना झोडपण्यासाठी वापर होतो. चादरीपासून बनविलेल्या दोरीनेच हे कैदी कारागृहातून फरार झाले आहेत.