बॅग विक्रेत्याची नागपुरातील सक्करदऱ्यात हत्या : तलवारीचे घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:29 PM2020-04-21T21:29:45+5:302020-04-21T21:32:00+5:30
दुकानाच्या अतिक्रमणाचा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद एका व्यापाऱ्याच्या जीवावर बेतला. बाजूलाच राहणाऱ्या गुंड बापलेकाने बॅग विक्रेते हरिभाऊ रामभाऊ सावरकर (वय ५५) यांच्यावर तलवारीचे घाव घालून त्यांची हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुकानाच्या अतिक्रमणाचा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद एका व्यापाऱ्याच्या जीवावर बेतला. बाजूलाच राहणाऱ्या गुंड बापलेकाने बॅग विक्रेते हरिभाऊ रामभाऊ सावरकर (वय ५५) यांच्यावर तलवारीचे घाव घालून त्यांची हत्या केली. मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडे प्लॉट परिसरात ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंटी ऊर्फ शेरखान नूरखान शेख आणि त्याचा बाप नूरखान शेख अशी आरोपींची नावे आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले.
भांडे प्लॉट परिसरात लक्ष्मी कॉम्प्लेक्स नामक इमारत आहे. या इमारतीत व्यापाऱ्यांची वेगवेगळे दुकाने आहे आणि डॉक्टर व अन्य व्यावसायिकही तेथे ते आपली सेवा देतात. इमारतीच्या खालच्या भागात आरोपी बंटी आणि त्याचा बाप नूरखान शेख या दोघांनी प्रारंभी एचबीटी नावाने मटन चिकनचे हॉटेल सुरू केले होते. ते या भागात सर्वत्र घाण करून ठेवत असल्याने आरोपींना इमारतीतील दुकानदारासह बाजूच्या नागरिकांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे आरोपींना ते दुकान बंद करावे लागले. परिणामी आरोपी कमालीचे चिडले होते. ते कुणाही सोबत वाद घालायचे आणि त्यांना मारहाण करायचे.
मंगळवारी त्यांनी बॅगविक्रेता हरिभाऊ सावरकर यांच्यासोबत वाद सुरू केला. त्यांच्या घरापासून काही अंतरावर दुपारी ४.३० च्या सुमारास आरोपी बंटी आणि त्याचा बाप नूरखान शेख या दोघांनी सावरकर यांच्यावर तलवारीने हल्ला चढवून त्यांची भीषण हत्या केली. भररस्त्यावर हा थरारक प्रकार घडल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. लॉकडाऊन असूनही प्रचंड गर्दी तेथे जमली. माहिती कळताच सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला व जमावाला शांत केले.
वादाला बिल्डरही कारणीभूत ?
गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या जीवघेण्या वादाला ही इमारत बांधणारा बिल्डरही कारणीभूत असल्याची जोरदार चर्चावजा आरोप संतप्त नागरिकांमध्ये होता. बिल्डरने पार्किंगची जागा गुंड बापलेकाला विकली. त्यामुळेच हा वाद सुरू झाला. तो टोकाला गेल्यानंतर बिल्डरने वाद निकाली काढण्याऐवजी आपली जबाबदारी झटकली. त्याचमुळे हे गुंड बापलेक वारंवार तेथील व्यापाऱ्यांवर हल्ला करून दहशत पसरवत होते.