भर दिवसा नागपुरात बॅग लिफ्टिंग, ५.३६ लाख लंपास
By योगेश पांडे | Updated: February 28, 2025 00:15 IST2025-02-28T00:15:46+5:302025-02-28T00:15:57+5:30
Nagpur Crime News: मानेवाडा रिंग रोडवरील तपस्या महाविद्यालयाजवळ भर दिवसा दुचाकीवरील आरोपींनी बॅग लुटली व ५.३६ लाखांची रोकड लंपास केली. संबंधित रोकड पेट्रोलपंपावरील होती व तेथील कर्मचारी बॅंकेत जमा करायला घेऊन चालला होता.

भर दिवसा नागपुरात बॅग लिफ्टिंग, ५.३६ लाख लंपास
- योगेश पांडे
नागपूर - मानेवाडा रिंग रोडवरील तपस्या महाविद्यालयाजवळ भर दिवसा दुचाकीवरील आरोपींनी बॅग लुटली व ५.३६ लाखांची रोकड लंपास केली. संबंधित रोकड पेट्रोलपंपावरील होती व तेथील कर्मचारी बॅंकेत जमा करायला घेऊन चालला होता. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
विहीरगाव दिघोरी टोलनाक्याजवळील पेट्रोलपंपाचे खाते रिंग रोडवरील एका खाजगी बॅंकेत आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पेट्रोलपंपावरील रविंद्र वर्मा हे ५.३६ लाखांची रोकड बॅंकेत जमा करण्यासाठी दुचाकीवर डबल सीट बसून येत होते. बॅंकेसमोर दुचाकी थांबल्यावर ते उतरले व दुचाकी स्टॅंडवर लावत असताना मागून हेल्मेट घातलेला एक आरोपी आला. त्याने वर्मा यांच्या हातातील बॅग हिसकावली व पळ काढला. रस्त्यावर दुसरा आरोपी दुचाकी चालू करून उभाच होता. बॅग हिसकाविणारा आरोपी त्यावर बसला व दोन्ही आरोपी भरधाव वेगाने फरार झाले. वर्मा यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचण येत आहे. काही महिन्यांअगोदर तेथे एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला होता. ती घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. मात्र त्यानंतर संबंधित खाजगी आस्थापनेच्या सीसीटीव्हीची दिशा बदलण्यात आली होती. त्यामुळे आरोपी त्यात दिसू शकलेले नाहीत. आरोपी वर्मा यांचा पाठलाग करत आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना नेमकी कुणी टीप दिली याचा शोधदेखील सुरू आहे.