नागपुरातील महाठग बघेलच्या ठगबाजीचे जाळे देशभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:40 PM2018-01-15T14:40:25+5:302018-01-15T14:42:28+5:30

देशभरात ठगवाजीचे नेटवर्क विस्तारून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा महाठग पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल सध्या नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक) कस्टडीत आहे. त्याने देशभरातील नागरिकांची रक्कम हडपून दिल्ली, नोएडासह ठिकठिकाणी मोक्याच्या जमिनी घेतल्या. तेथे इमारतीही बांधल्याची माहिती आहे.

Baggel's snatch network in Nagpur | नागपुरातील महाठग बघेलच्या ठगबाजीचे जाळे देशभर

नागपुरातील महाठग बघेलच्या ठगबाजीचे जाळे देशभर

Next
ठळक मुद्देदिल्ली, नोएडातही मालमत्ता : सेबी अन् सीबीआयनेही केली कारवाई

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात ठगवाजीचे नेटवर्क विस्तारून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा महाठग पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल सध्या नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक) कस्टडीत आहे. त्याने देशभरातील नागरिकांची रक्कम हडपून दिल्ली, नोएडासह ठिकठिकाणी मोक्याच्या जमिनी घेतल्या. तेथे इमारतीही बांधल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेशातील सेमरपाखा, ब्योहारी (जि. शहडोल) येथील मूळ निवासी असलेला बघेल कमालीचा धूर्त आहे. त्याने २००९ मध्ये सात मित्रांना गोळा करून साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने कंपनी निर्माण केली. प्रारंभी मध्य प्रदेशात आणि राजस्थानमधील जयपूरला या कंपनीचे मुख्यालय सुरू केले. कंपनीत फिक्स डिपॉझिट केल्यास एक लाखाला साडेपाच वर्षात दोन लाख, तर नऊ वर्षात तीन लाख रुपये देण्यासोबतच अपघाती विमा क्लेम देण्याचा तो दावा करीत होता. कंपनीच्या प्रचार प्रसारासाठी त्याने मोठ्या प्रमाणात एजंट नेमले होते. तेदेखिल चढवून बढवून माहिती देत गुंतवणूकदारांना सापळ्यात अडकवत होते. अशा प्रकारे २०१३ पर्यंत बघेलने कोट्यवधी रुपये गोळा केले. राजस्थान, मध्य प्रदेश, नोएडा दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यात तो नवनव्या शहरात कंपनीच्या शाखा उघडत होता. तेथून गोळा झालेल्या रकमेतून त्याने नोएडा, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी जमिनी विकत घेतल्या. त्यातील काहींवर भूखंड टाकले तर काही जमिनीवर त्याने इमारती उभ्या करून कोट्यवधीची मालमत्ता जमा केली.
महाठग बघेलच्या फसवणुकीच्या नेटवर्कची माहिती मिळाल्याने सेबीने त्याची चौकशी सुरू केली. त्याचा व्यवहार संशयास्पद वाटताच त्याला नोटीस देऊन गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा करण्यास मनाई केली. दुसरीकडे बघेलच्या फसवणुकीच्या नेटवर्कची सीबीआयनेही चौकशी सुरू केली. बघेलची कंपनी घोटाळेबाज असल्याचे लक्षात येताच देशभरातील विविध प्रांतात कंपनीच्या शाखांवर सीबीआयने तीन वर्षांपूर्वी छापे मारले आणि महाठग बघेलवर कारवाई केली. त्याची ठिकठिकाणची सुमारे २५० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचीही माहिती आहे.
देशात फसवणुकीच्या १४७ शाखा
सीबीआयच्या कारवाईनंतर महाठग बघेलचे देशभरातील नेटवर्क विस्कळीत झाले. गुंतवणूकदार त्याची ठिकठिकाणी तक्रार करू लागले. त्यानंतर त्या त्या ठिकाणच्या पोलिसांनीही त्याला अटक करण्यासाठी धावपळ सुरू केली. महाठग बघेलने देशातील विविध प्रांतात एकूण १४७ शाखा उघडून हजारो गुंतवणूकदारांची आयुष्याची कमाई गिळंकृत केली आहे.
३१ महिन्यांपासून जेल यात्रा
महाठग बघेलविरुद्ध विविध प्रांतातील शहरात आतापर्यंत २८ गुन्हे दाखल झाले. त्या त्या ठिकाणचे पोलीस बघेलला मोस्ट वॉन्टेड म्हणून शोधत आहे. त्याची ३१ महिन्यांपासून त्याची जेल यात्रा सुरू आहे. एकीकडचा तपास संपला की दुसरीकडचे पोलीस त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेतात.
भोपाळमध्ये अटकेचा प्रयत्न
दोन वर्षांपासून बघेलला अटक करण्यासाठी धावपळ करणाऱ्या नागपूर पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी त्याला भोपाळमध्ये अटक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी तो यशस्वी झाला नाही. आता मात्र त्याला मध्य प्रदेशच्या शहाडोलमधून पोलिसांनी अटक करून नागपुरात आणले. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. नरके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

Web Title: Baggel's snatch network in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.