बहुजनांनो सत्तेची चाबी हाती घ्या : बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 09:40 PM2018-03-15T21:40:44+5:302018-03-15T21:41:21+5:30
कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्र्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कांशीरामजी यांची चळवळ पूर्णत्वास न्यायची असेल तर महाराष्ट्रात व देशात बसपाचे सरकार स्थापन करा, सत्तेची चाबी आपल्या हाती घ्या. ज्या दिवशी सत्तेची ही मास्टर चाबी आपल्या हाती येईल व बहुजन समाज सत्ताधारी बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने मान्यवर कांशीरामजी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्र्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी येथे केले.
बसपा, बामसेफ, डीएसफोरचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त बसपा नागपूर विभागातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी संघटन समीक्षा व बहुजन समाज दिवस समारोह आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश प्रभारी अॅड. संदीप ताजने, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर विशेष अतिथी होते.
प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले, कांशीराम यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून केली. फुले-शाहू-आंबेडकर व तमाम मानवतावादी महापुरुषांचे स्वप्न साकार करणे हेच त्यांचे ध्येय व उद्दिष्ट होते. याच ध्येयाने झपाटलेल्या कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात जाऊन बसपाची सत्ता स्थापन केली. मायावतींसारखी एका दलित महिला देशाच्या सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनू शकते हे निराश व हताश झालेल्या शोषित-पीडित-बहुजन समाजाला त्यांनी दाखवून दिले. २०१९ मध्ये देखील केंद्रात बसपाची सत्ता येईल व मायावती पंतप्रधान होतील, असा विश्वाससुद्धा सुरेश साखरे यांनी व्यक्त केला.
यावेळी कृष्णाजी बेले, जितेंद्र म्हैसकर, प्रा. पी.एस. चंगोले, राजकुमार शेंडे, चेतन पवार, मंगेश ठाकरे, बाळासाहेब गावंडे, अरविंद माळी, इंजी. दादाराव उईके यांनीही कांशीराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी केले. संचालन पृथ्वीराज शेंडे यांनी केले. रुपेश बागेश्वर यांनी आभार मानले.
मजबूत संघटनेशिवाय विजय अशक्य
अॅड. संदीप ताजने यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. संघटना बांधणी झाली परंतु प्रामाणिकपणे संघटनेची काळजी घेतली जात नाही. अनेक पदाधिकारी केवळ कागदोपत्री आहेत. त्यांना कामाला लावण्याची गरज आहे. संघटना मजबूत नसेल तर विजय अशक्य आहे. तेव्हा संघटना मजबूत करा. संघटनेची प्रामाणिकपणे बांधणी झाल्यास किमान २० आमदार सहज निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.