आरोपी पुतण्याचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: March 2, 2016 03:22 AM2016-03-02T03:22:31+5:302016-03-02T03:22:31+5:30
पाचपावली हद्दीतील हबीबनगर टेका येथील सख्ख्या काकाच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. मुनघाटे ....
सत्र न्यायालय : टेका येथील खून प्रकरण
नागपूर : पाचपावली हद्दीतील हबीबनगर टेका येथील सख्ख्या काकाच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. मुनघाटे यांच्या न्यायालयाने आरोपी पुतण्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
मोहम्मद इमरान मोहम्मद ताहीर अन्सारी (१८), असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद शाकीर अब्दुल कादीर अन्सारी (२८), असे मृताचे नाव होते. १० आॅक्टोबर २०१५ रोजी शाकीरचा त्याचा मोठा भाऊ मोहम्मद ताहीर अब्दुल कादीर अन्सारी (५०) आणि पुतण्या मोहम्मद इमरान यांनी खून केला, असा आरोप आहे.
वडिलांच्या मालमत्तेतून केले होते बेदखल
मोहम्मद शाकीर याचा आपल्या भावांसोबत वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होता. मोहम्मद शाकीर हा पत्नी नुसरत परवीन (२६) आणि मुलांसोबत वडिलांनी बांधलेल्या इमारतीमध्ये राहत होता. ही इमारत शाकीरच्या वडिलांनी आपला शेवटचा मुलगा सलीम याच्या नावावर केली होती. वडिलांचा सात वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. मोहम्मद शाकीर हा आपल्या भावांना वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सा मागत होता. परंतु भावांनी त्याला हिस्सा दिला नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.
घटनेच्या एक दिवसआधी ९ आॅक्टोबर रोजी शाकीरचे आपला भाऊ ताहीर याच्यासोबत भांडण झाले होते.
घटनेच्या दिवशी १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास शाकीर हा आपली पत्नी नुसरत परवीन हिला छतावर झोपण्यास जातो, असे सांगून गेला होता. काही वेळातच नुसरत परवीन हिला भांडणाचा आवाज ऐकू आला होता. लागलीच ती छतावर धावत गेली असता इमरान हा तिच्या पतीला पकडून ठेवून ताहीर हा दंडाने त्याच्या डोक्यावर प्रहार करीत असल्याचे दृश्य तिला दिसले होते.
शाकीरच्या डोक्याच्या मागच्या भागावर प्रहार करताच तो खाली कोसळला होता. तिने आरडाओरड करताच इतर लोक धावून आले होते. लागलीच दोन्ही आरोपी पळून गेले होते. मेयो इस्पितळात शाकीरचा मृत्यू झाला होता. पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून ११ आॅक्टोबर रोजी दोन्ही आरोपींना अटक केली होती.
इमरान याने जामीन अर्ज दाखल करताच तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एन.आर. केंचे हे आहेत. (प्रतिनिधी)