नशेत दोघांना उडविणाऱ्या महिलेस जामीन नाकारला; नागपुरात मर्सिडिजने घेतले होते दोन बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 09:15 AM2024-05-25T09:15:04+5:302024-05-25T09:15:47+5:30
ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली होती. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होती.
नागपूर : पुण्यातील पार्शे कारसारखा भीषण अपघात करणारी नागपूरची ३९ वर्षीय धनाढ्य महिला रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी हा निर्णय दिला.
ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली होती. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होती. तिने रामझुल्यावर मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे हे दोन्ही तरुण दूरवर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी दोन्ही तरुणांना जवळच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरनी मोहम्मद हुसैनला तपासून मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोनही तरुण बँक फायनान्सचे काम करीत होते.
गृहमंत्र्यांनी जबाबदारी पाळली : शरद पवार
मुंबई : पुणे अपघात प्रकरणात राज्याच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी पाळलेली आहे, ती दिसल्यानंतर उगीच याला वेगळे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पुणे अपघातातील आरोपींच्या वकिलाबरोबर शरद पवारांचा फोटो विरोधकांनी समोर आणला आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, आपला फोटो कुणाबरोबर असला म्हणजे त्याच्याशी संबंध कसा जोडता? असा सवाल शरद पवारांनी उद्विग्न होत विचारला.