नागपुरात बजरंग दलाकडून 'व्हॅलेंटाईन'ला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:28 PM2020-02-14T22:28:16+5:302020-02-14T22:29:43+5:30
व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद -बजरंग दलाकडून शुक्रवारी दुपारी तेलंगखेडी ते फुटाळा तलाव अशी रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद -बजरंग दलाकडून शुक्रवारी दुपारी तेलंगखेडी ते फुटाळा तलाव अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली बिभत्सपणा किंवा अश्लिलता दिसून आली तर ते सहन करणार नाही, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बजरंग दलातर्फे ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात रॅली काढण्यात आली. दुपारी ४ च्या सुमारास तेलंगखेडी बगिच्याजवळून रॅलीला सुरुवात झाली. सर्व कार्यकर्ते निदर्शने करत पायीच फुटाळा तलावापर्यंत पोहोचले. तेथेदेखील ‘व्हॅलेंटाईन डे’ विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी ‘टेडीबिअर’देखील जाळले.
या रॅलीच्या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात घोषणाबाजी केली. आम्ही प्रेमाचा विरोध करत नाही. मात्र ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली अश्लिलतेचा प्रसार होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यासाठीच आम्ही ही भुमिका घेतली आहे, अशी माहिती बजरंग दलाचे शहर सहसंयोजक विशाल पुंज यांनी दिली.
यंदा संयमित आंदोलन
बजरंग दलाकडून दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला इशारा रॅली काढण्यात येते. यावर्षी मात्र असा प्रकार झाला नाही. शिवाय मोटारसायकलवर रॅली न काढता कार्यकर्त्यांनी चालतच निदर्शने केली. विरोध प्रदर्शन झाल्यानंतर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली.
राष्ट्रीय बजरंगदलाकडूनदेखील विरोध प्रदर्शन
दरम्यान डॉ.प्रवीण तोगडिया यांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय बजरंग दलातर्फेदेखील ‘व्हॅलेंटाईन डे’चा विरोध करण्यात आला. दुपारी चारच्या सुमारास संविधान चौक येथे कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केले. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली सुरू असलेले पाश्चिमात्यकरण व अश्लिलता याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री किशोर दिकोंडवार, राष्ट्रीय बजरंग दलाचे शहराअध्यक्ष यजेंद्रसिंह ठाकूर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे शहराअध्यक्ष वैभव कपूर, सहमंत्री प्रसाद काठीकर, पूर्व नागपूर महामंत्री अक्षय मुद्देमवर, राजेश शुक्ला प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मागील वर्षी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली.