मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत; मी त्यांचाच शिवसैनिक : आमदार नितीन देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 01:01 PM2022-06-22T13:01:39+5:302022-06-22T13:27:06+5:30
बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे आज गुवाहाटीहून नागपूरला परतले आहेत.
नागपूर : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सूरतमध्ये गेलेले बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून नागपूरला परतले आहेत. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, 'मला काहीही झाले नाही. गुजरात पोलिसांनी मला जबरदस्तीने इस्पितळात नेले. मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मी त्यांचाच शिवसैनिक आहे'.
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. त्यातच नॉट रिचेबल असलेले बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच आज नागपूर विमानतळावर आगमन झालं.
शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सुमारे ३० आमदारांसह बंडाचा झेंडा फडकावत सुरतमध्ये तळ ठोकला होता. यामध्ये अकाेला जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश होता. दरम्यान, देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी मंगळवारी पती बेपत्ता झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
दरम्यान, देशमुख यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सुरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. यानंतर आज त्यांच नागपूर विमानतळावर आगमन झालं. "मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे आणि राहणार. मी परत आलो आहे आणि बाकीचेही येतील अशी खात्री मला आहे. मी तिथं आमच्या मंत्र्यांसोबत गेलो होतो. पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी सुखरुप परतलो आहे", अशी स्पष्टोक्ती आमदार नितीन देशमुख यांनी दिली. तर आता त्यांची पुढील भूमिका काय हे लवकरच स्पष्ट होईल.