गांधींच्या स्वप्नातील खरा नागरिक म्हणजे बाळासाहेब : लीलाताई चितळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:41 AM2020-02-01T00:41:43+5:302020-02-01T00:42:39+5:30
महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या बाळासाहेबांनी, त्या विचारांना सार्वजनिक जीवनातही अंतर्भूत केले. आयुष्यभर ते तसेच वागले. खऱ्या अर्थाने ते महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील नागरिकाप्रमाणे वागल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या बाळासाहेबांनी, त्या विचारांना सार्वजनिक जीवनातही अंतर्भूत केले. आयुष्यभर ते तसेच वागले. खऱ्या अर्थाने ते महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील नागरिकाप्रमाणे वागल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी केले.
विनोबा विचार केंद्राच्या सर्वोदय आश्रमात शुक्रवारी ज्येष्ठ गांधीवादी विचारक डॉ. बाळासाहेब सरोदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी, सर्वोदयी चळवळीशी निगडित सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते. तर लीलाताई चितळे, गांधीवादी विचारक मा.म. गडकरी, सर्वोदय आश्रमचे अध्यक्ष सुरेश पांढरीपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रत्यक्ष कार्यात असलेला माणूस अचानक गेला की त्याच्या वेदना तीव्र असतात. बाळासाहेबांचे कुटुंब हे अस्सल गांधीवादी आहे. हयात असताना अनेकजण माणसाचे दुर्गुण शोधत असतात आणि मृत्यूनंतर त्याच्या गुणांवर चर्चा केली जाते. बाळासाहेबांच्या हयातीतही त्यांच्या सद्गुणांवरच बोलले जात होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेल्या कार्याचा आता उजाळा होण्यास सुरुवात होईल, असे मा.म. गडकरी यावेळी म्हणाले. देवाने दिलेले आयुष्य ध्येयनिष्ठा आणि चैतन्याने भारून निघावे, असे आयुष्य बाळासाहेब जगले. वर्तमानात सुरू असलेल्या जेएनयु, जामिया विद्यापीठ प्रकरणांच्या काळात गांधी, विनोबा आणि बाळासाहेबांच्या विचारांची गरज असल्याचे सुरेश पांढरीपांडे यावेळी म्हणाले. रचनात्मक कार्य आणि मानव धर्म पाळणाऱ्या बाळासाहेबांनी कृतिशील सज्जनांची सांगड घातली होती. निष्क्रिय सज्जनांच्या काळात त्यांचे हे कार्य अतिशय महत्त्वाचे असल्याची भावना गिरीश गांधी यांनी अध्यक्षस्थानाहून व्यक्त केली. यावेळी बाळासाहेबांचे बालमित्र रामदास केवटे, अरुण कोठारी, डॉ. पराग चौधरी, रवी गुडधे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. संचालन रवींद्र भुसारी यांनी केले.