जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सुरू होणार ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 07:25 PM2023-04-01T19:25:32+5:302023-04-01T19:25:53+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये येत्या १ मे या महाराष्ट्र दिनापासून या दवाखान्यांना सुरुवात होणार आहे. या दवाखान्यांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बूस्ट मिळणार आहे.
नागपूर : नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये येत्या १ मे या महाराष्ट्र दिनापासून या दवाखान्यांना सुरुवात होणार आहे. या दवाखान्यांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बूस्ट मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात राज्याच्या आरोग्य विभागाकडून राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, अशा एकूण ५०० ठिकाणी हा दवाखाना सुरू केला जाणार आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यांसह विविध प्रकारच्या रक्तचाचण्यांची सेवा मोफत मिळणार आहे.
या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी, इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवादेखील पॉली क्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कंत्राटी पद्धतीने भरती
या ठिकाणी रुग्णांवर उपचारासाठी एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, स्टाफ नर्स, अटेंडंट, आदींची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हे दवाखाने सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी जागा व परिसरही जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. हे दवाखाने ओपीडीच्या स्वरूपात असल्याने साधारणत: सकाळच्याच सत्रात सुरू राहणार असल्याची माहिती आहे.
१५ व्या वित्त आयोगाकडून निधी
ग्रामीण भागातील दवाखान्यामधील रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांकरिता औषध खरेदीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत १५ व्या वित्त आयोगाकडून ४० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
............