भूजबळांच्या भेटीनंतर ईश्वर बाळबुधेंचा राष्ट्रवादीचा राजीनामा
By कमलेश वानखेडे | Published: September 5, 2024 04:10 PM2024-09-05T16:10:27+5:302024-09-05T16:11:09+5:30
Nagpur : पक्षफुटीसाठी शरद पवारांची संमती असल्याचे खोटे सांगितल्याचा दावा
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पदासह पक्षाच्या क्रीयाशील सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. बाळबुधे हे ओबीसी नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे बाळबुधे यांनी भूजबळ यांची भेट घेतल्यानंतर राजीनामा दिला. त्यामुळे भूजबळ यांनी पक्ष सोडण्यासाठी संमती दिली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता बाळबुधे हे लवकरच शरद पवार गटात सामील होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असतानाही बाळबुधे हे पक्षाच्या ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक होते. पक्ष फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांची साथ देणे पसंत केले. मात्र, गुरुवारी त्यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला. पक्ष फुटीनंतर काही ज्येष्ठ नेत्यांनी आमची दिशाभूल केली व या सर्व घडामोडीला शरद पवार यांची संमती असल्याचे आपल्याला सांगितले होते. दिलीप वळसे पाटील, छगन भूजबळ यासारखे मोठे नेते अजित पवार गटात सामील होताना दिसले. त्यामुळे त्या ओघात आम्हीही सहभागी झालो, असा दावा बाळबुधे यांनी केला. राजीनामा देण्यापूर्वी आपण छगन भूजबळ यांची भेट घेतली. त्यांना पक्षात होत असलेली घुसमट, ओबीसींना मिळत नसलेला न्याय आदी बाबींची माहिती दिली व राजीनामा देत असल्याची कल्पना दिल्याचेही बाळबुधे यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्याच बाळबुधे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.