आयबीएम रोडवर गिट्टीने भरलेली जीप उलटली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:50+5:302020-12-14T04:25:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गिट्टीखदान परिसरातील आयबीएम रोडवर रविवारी गिट्टीने भरलेली मालवाहक जीप उलटली. ऐन उतारावर घडलेल्या या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान परिसरातील आयबीएम रोडवर रविवारी गिट्टीने भरलेली मालवाहक जीप उलटली. ऐन उतारावर घडलेल्या या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा न झाल्याने मोठा अनर्थ टळला. वाहन चालक जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आयबीएम रोडने सेमिनरी हिल्सकडे जाताना प्रचंड चढाव आहे, तर वरून येताना उतार लागतो. हा रस्ता अतिशय दाटीवाटीच्या वस्तीतून जात असल्याने हा रस्ता अतिशय धोकायदायक आहे. अनेकदा वाहने उलटून लोकांच्या घरांमध्ये घुसतात. त्यामुळे अनेकदा लोकांचा जीव जातो. संपत्तीचेही नुकसान होते. काही दिवसापूर्वीच येथे एक मालवाहतूक ट्रक सेमिनरी हिल्सकडून येताना उलटला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला होता, तर काही घरांचे नुकसानही झाले होते. यावेळी नागरिकांनी येथे सुरक्षेचे उपाय करण्याची मागणी केली होती. तेव्हा जीएसआय कार्यालयाजवळ राेडवर जड वाहतुकीच्या बंदीसाठी खांब लावण्यात आले, परंतु काटोल रोडच्या दिशेने खांब लावले नाही. त्यामुळे सेमिनरी हिल्सकडे जाणारी वाहने अजूनही या रस्त्याचा वापर करायचा प्रयत्न करतात. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास काटोल रोडवरून आयबीएम रोडने सेमिनरी हिल्सकडे गिट्टीने भरलेली जीप जात होती. परंतु जीएसआय कार्यालयाजवळ पाेहोचताच जीप पुढे जाण्याऐवजी मागे मागे येत उलटली.
बॉक्स
संगनमताची शक्यता
आयबीएम रोडवर जीएसआय कार्यालयाजवळ ३० मीटरचा चढाव अतिशय धोकादायक आहे. येथे दुचाकी वाहन केवळ चालकस्वार असतानाही गाडीचे इंजिन काम करणे बंद करते. अशा परिस्थितीत मालवाहक वाहनांवर येथे बंदी आवश्यक आहे. या रोडवर जडवाहतुकीस बंदी घालण्यासाठी जेव्हा येथे खांब लावण्याचे काम सुरू होते तेव्हा काही जणांनी याला विरोध का केला, असा प्रश्न निर्माण होतो. ट्रकच्या वाहतुकीवर बंदी घातल्यानंतर रेती व गिट्टीसह इतर साहित्याच्या वाहतुकीसाठी येथे लहान चारचाकी वााहनांचा वापर केला जात आहे. याचवेळी दुसऱ्या बाजूने खांब लावण्यासाठी विरोध करणारे या धंद्यात सहभागी असल्याची शक्यता दिसून येते. अन्यथा या अतिशय अरुंद मागार्वर नागरिकांच्या सुरक्षेसाठी केल्या जात असलेल्या कामावर आक्षेप घेण्याची गरज नव्हती.
बॉक्स
पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शॉर्टकट
काटोल रोड ते सेमिनरी हिल्स मार्गे अमरावती रोडवर जाण्यासाठी केवळ ८०० मीटरचा आयबीएम रोड हा शॉर्टकट रस्ता आहे. सूत्रानुसार पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी बांधकाम साहित्य घेऊन जाणारे मालवाहू वाहन या मार्गाचा वापर करतात. आता या रस्त्याने ट्रक जाऊ शकत नाही. त्यामुळे छोट्या मालवाहक वाहनांचा वापर केला जात आहे. त्यामुळे आता आयबीएम रोडवर जीएसआय कार्यालयाच्या बाजूने लावण्यात आलेल्या खांबाप्रमाणे काटोल रोडच्या बाजूनेही खांब लावण्याची मागणी केली जात आहे.