बुलेटपेक्षा बॅलेटचे महत्त्व अधिक
By admin | Published: January 26, 2017 02:38 AM2017-01-26T02:38:23+5:302017-01-26T02:38:23+5:30
बुलेटपेक्षा बॅलेटचे महत्त्व अधिक आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये बुलेटच्या जोरावर सर्वसामान्यांना मतापासून वंचित ठेवल्या जाते,
नागपूर : बुलेटपेक्षा बॅलेटचे महत्त्व अधिक आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये बुलेटच्या जोरावर सर्वसामान्यांना मतापासून वंचित ठेवल्या जाते, आपण त्यांना बॅलेटच्या माध्यमातून योग्य उत्तर देऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी डॉ. विकास आमटे यांनी केले. तसेच कुष्ठरोग्यांनाही मतदानाचा अधिकार मिळायला हवा. केवळ हाताची बोटे नाहीत म्हणून त्यांचा अधिकार डावलल्या जाऊ नये, असेही डॉ. आमटे यावेळी म्हणाले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित सातव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, ज्येष्ठ गांधीवादी विचारक विभा गुप्ता, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य, तरुण उद्योजक हसन शफीक, प्रशासकीय अधिकारी अमन मित्तल, सुप्रसिद्ध सर्जन स्कीन बँकेचे संस्थापक डॉ. समीर जहागिरदार, आंतरराष्ट्रीय बॅटमिंटनपटू अरुंधती पानतावणे, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू मल्लिका भांडारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार म्हणाले, लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांनी सक्रियपणे सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावतानाच जनतेच्या सहमतीचे सरकार निवडताना लोकशाही परंपरा संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे. वंश, जात, धर्म, पंथ यांचे बंधन न ठेवता सर्वांना मतदानाचा अधिकार घटनेने दिला आहे. या प्रक्रियेमधून सक्षम नेतृत्व निवडण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तरुणांनी आपल्या अधिकार आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवून मतदान करावे.
मतदानाचे महत्त्व विशद करताना विभा गुप्ता म्हणाल्या की, तरुणांकडे सर्व सोई-सुविधा उपलब्ध असून देखील मतदानाचा हक्क बजावण्याबाबत उदासीनता असते. तरुणांनी ही उदासीनता दूर करून आपले अस्तित्व सिद्ध करून दाखविणारच हा ध्यास बाळगायला हवा. कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे म्हणाले, महात्मा गांधीजींच्या विचारातील रामराज्यासाठी तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
यावेळी प्रशांत वैद्य, हसन शफीक, अमन मित्तल, अरुंधती पाणतावने, मल्लिका भांडारकर, डॉ. समीर जहागीरदार यांनीही युवकांना मतदानासाठी आवाहन केले.
यावेळी ‘सक्षम करू या युवा मतदार’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुरभी ढोमणे आणि अमर कुळकर्णी यांनी देशभक्तीपर गीत गायले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)