फुग्याच्या सिलींडरचा स्फोट, चार वर्षांचा चिमुकला ठार, दोन महिला जखमी
By दयानंद पाईकराव | Published: December 24, 2023 11:23 PM2023-12-24T23:23:01+5:302023-12-24T23:31:01+5:30
सदरच्या बिशप कॉटन स्कूल मैदानासमोरील घटना
नागपूर : ख्रिसमसच्या पूर्व संध्येला नातेवाईकांसह खरेदीसाठी आलेला एक चार वर्षांचा चिमुकला फुग्याच्या सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे ठार झाला. तर या स्फोटात दोन महिला जखमी झाल्या. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिझान आसिफ शेख (वय ४, रा. मानकापूर) असे या सिलींडर स्फोटात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर फरिया हबीब शेख (वय २८) आणि अनमता हबीब शेख (वय २४) असे जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. जखमी झालेल्या फारिया व अनमता या सिझानच्या मावशी आहेत. त्या खरेदीसाठी बिशप कॉटन स्कूल समोरील मेदानासमोर गेल्या होत्या. तेथे रात्री ८.३० वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता.
फुगेवाल्याच्या बाजुला तीघेही उभे असताना अचानक सिलींडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाले. त्यानंतर ते सिलींडर सिझानच्या डोक्यावर आदळले. यात सिझान गंभीर जखमी झाला. तर फरिया व अनमता यांनाही सिलींडर लागल्यामुळे त्या जखमी झाल्या. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील सिझान, फरिया व अनमता यांना कुटुंबीयांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. यातील सिझानला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमी फरिया आणि अनमता यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर सदर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
फुगे विक्रेता झाला फरार
सिलींडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाल्यानंतर सिझानच्या डोक्यावर पडले आणि दोन महिला जखमी झाल्याचे पाहून फुगे विक्रेत्याने आपली मोपेड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. सदर पोलिसांनी फुगे विक्रेत्याच्या मोपेडचा क्रमांक मिळवून त्याचा शोध सुरु केला आहे. घटनास्थळी फुटपाथवर नेहमीच विक्रेत्यांची रेलचेल राहत असल्यामुळे नागरिकांची या ठिकाणी नेहमीच गर्दी राहत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.