बालमन रमले पत्रकारितेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:34 AM2017-11-14T00:34:53+5:302017-11-14T00:42:50+5:30
नागपूर : १३ नोव्हेंबर रोजी लोकमत कार्यालयातील न्यूजरुमचे स्वरूप जरा वेगळे होते. नेहमीची लगबग आणखी वेगवान झाली होती. रोजच्यापेक्षा आवाजही वाढला होता. मैत्रेयी, अगं ती प्रिंट घे जरा... अनुप त्या फोटोचे काय झाले...? साची बघ तर प्रूफ रीडिंग आटोपले का...? आर्यन, अरे शीर्षक मोठे झाले एडिट कर...असे शब्द तसे रोजचेच होते पण न्यूजरुममध्ये सुरू असलेला हा संवाद रोज इथे काम करणाºया संपादकीय मंडळींचा नव्हे तर एका दिवसासाठी पत्रकाराच्या भूमिकेत असलेल्या सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा होता. खास बालदिनाचे औचित्य साधून लोकमतने ‘महाराष्ट्राचे भावी महापत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला व या उपक्रमात सहभागी होत शहरातील १२ शाळांच्या २८ विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात प्रचंड कल्पकतेने लोकमतच्या एका पानाचे यशस्वी संपादन केले.
संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संगणकावर पेज डिझायनिंगचा अनुभव घेतला. स्टाईलशीट कशी वापरतात, रंगीत चौकट कुठे असावी, स्क्रीन म्हणजे काय, रिव्हर्स कशाला म्हणतात, एका पानाला किती कॉलममध्ये विभाजित केले जाते. एखाद्या बातमीचे कॉलम ठरवताना बातमीतल्या नेमक्या कुठल्या बाबी लक्षात घ्याव्या, फोटोचे प्लेसमेंट कसे असायला हवे, फोटो निवडताना त्याचे रिझोलेशन का पाहावे लागते, या सर्व प्रश्नांची उत्तरे उत्सुकतेने जाणून घेतली. या उत्तरांनी समाधान झाल्यावर त्याच पद्धतीने संगणकावर प्रत्यक्ष पानाची बांधणीही केली.
बातमीदाराच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या या बच्चेकंपनींमध्ये सर्वाधिक उत्सुकता कॅमेºयाबद्दल दिसून आली. कुणाला आवडेल छायाचित्रकार बनायला असे विचारले असता, अनेकांनी हात वर केले. या मुलांना लोकमतच्या छायाचित्रकारांनी कॅमेºयातील बारकावे, कॅमेरा कसा हाताळावा, घटनेनुसार फोटो कसे घ्यावे, रंगसंगती कशी साधावी, कॅमेºयाचे बदलते स्वरूप, छायाचित्र कॅमेराबद्ध झाल्यानंतर त्यापुढची प्रक्रिया काय असते, याचे सविस्तर ज्ञान दिले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी स्वत: कॅमेरा हाताळून बघितला. काही क्लीकसुद्धा त्यांनी केले. कॅमेरा हाताळण्याचा एक वेगळाच आनंद या मुलांच्या चेहºयावर झळकत होता. कॅमेºयाबद्दलची माहिती अतिशय कुतूहलाने मुले ऐकत होती.
बैठक झाली, बातम्या ठरल्या अन् लागले कामाला
दैनिकाचे काम कसे चालते, याबाबत प्रचंड उत्सुकता घेऊनच हे विद्यार्थी लोकमत कार्यालयात आले. आल्याआल्या सर्वात आधी त्यांनी सगळे काम समजून घेतले. यानंतर या विद्यार्थ्यांची एक बैठक झाली. यात या विद्यार्थ्यांनीच न्यूजरुममध्ये कोण काय करणार, याची जबाबदारी प्रत्येकाला वाटून दिली. त्यानुसार कुणी बातमी तयार करायला लागला, कुणी त्यावर संपादकीय संस्कार करायला लागला तर कुणी मुद्रित शोधन केले. जे पान या विद्यार्थ्यांना लावायचे होते त्यातील सगळे मथळे, इंट्रो, कॅप्शन या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केले. तयार झालेला मजकूर प्रत्यक्ष पानावर घेत गटागटाने त्यावर चर्चा केली. बदल सुचवले. संपादनाच्या प्रक्रियेत हे विद्यार्थी इतके गुंग झाले होते की त्यांना जणू आजचा दिवस संपूच नये,असे वाटत होते.
पहिल्यांदा बघितले वृत्तपत्राचे कार्यालय
लोकमतने आयोजित केलेल्या या उपक्रमात ग्रामीण भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. हे विद्यार्थी मोठ्या उत्सुकतेने लोकमतच्या कार्यालयात आले. वृत्तपत्राचे भव्यदिव्य कार्यालय बघून हे विद्यार्थीही अवाक् झाले. नागपुरात आल्यावर बाहेरून दिसणारे लोकमतचे कार्यालय आतमधून कसे असेल, काय काम होत असेल, ते कधी बघता येईल का? याची उत्सुकता मुलांमध्ये होती. आज मुलांनी ते प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर त्यांच्या चेहºयावर आनंद झळकत होता. लोकमतने ही संधी दिल्याबद्दल या विद्यार्थ्यांनी आभार मानले.
आगळावेगळा अनुभव
दररोज सकाळी घरी वृत्तपत्र येते, ते आम्ही वाचतोही. परंतु वृत्तपत्र कसे तयार होत असेल, त्याची प्रक्रिया कशी असेल, एकाच ठिकाणाहून देश-विदेशातील घटना कशा मिळवत असतील, शहरातील गल्लीबोळीत घडणाºया घटनांची माहिती कशी मिळत असेल, हे जाणून घेण्याचे कुतूहल होते. परंतु तशी कधी संधी मिळाली नाही. परंतु आज लोकमतने आपल्या कामकाजात आम्हाला प्रत्यक्ष सहभागी करून घेतले. संपादकांनी पत्रकारितेच्या क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले. वृत्तपत्राच्या कार्यालयात आम्ही घालविलेले तीन तास आमच्यासाठी एक आगळावेगळा अनुभव राहिला, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
चित्र, कविता, लेखातून व्यक्त झाले विद्यार्थी
आज या मुलांना लोकमतने दिलेल्या संधीमुळे त्यांच्यातील लेखक, कलावंत, चित्रकार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त झाला. या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी कविता, कथा, प्रवासवर्णन यातून आपली कल्पकता कागदावर उमटविली. काही मुलांनी वेगवेगळ्या आशयाचे चित्र रेखाटले. श्रेया शेंबेकर या विद्यार्थिनीने प्रामाणिकपणे केलेल्या कोणत्याही कामातून यश प्राप्त होते, या विषयावर बोधकथा लिहिली. यात तिने संघर्षशील बालकाचा संघर्ष प्रतिबिंबित केला. ईश्वरी डाखोळे हिने कुटुंब व्यवस्थेत वडिलधाºयांचे काय महत्त्व आहे, या विषयावर आजी-आजोबा एक संस्कार व्यासपीठ यावर भाष्य लिहले. मैत्रेयी घनोटे हिने तिच्या जीवनात आलेले काही अविस्मरणीय प्रसंग लेखातून व्यक्त केले. अनुष्का गंधे हिने मतदानाचे महत्त्व विशद करीत, संविधानाने दिलेला हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन करीत ‘मतदान हे खरे अमृतदान!’ या विषयावर आव्हानात्मक लेख लिहला. मृणालिनी खोंडे हिने सरदार वल्लभभाई पटेलांवर माहितीपर लेख लिहिला. सिया आंबेकर हिने चतुर चित्रकार या विषयावर हास्य कविता रचली. जागृती वारकर या विद्यार्थिनीच्या लेखणीतून शेतकºयांच्या व्यथा प्रतिबिंबित झाल्या. तिने ‘माझा शेतकरी’ या विषयावर अतिशय भावस्पर्शी कविता लिहिली. अश्विनी बडवाईक या विद्यार्थिनीने शाळेत मिळणाºया संस्कारांबद्दल, तिला शाळेप्रतिवाटत असलेल्या आपुलकीबद्दल भावना व्यक्त करणारी कविता रचली. अनुजा सहस्रबुद्धे या विद्यार्थिनीने बेंगळुरू येथील प्रशांती निलमय या गावाबद्दल माहिती दिली. तिने या गावाला भेट दिल्यानंतर तिला आलेले अनुभव आपल्या लेखणीतून व्यक्त केले. कांचन देवघरे हिने प्रवासवर्णनात एक सहल अविस्मरणीय कशी ठरली,याचे सुंदर वर्णन आपल्या लेखणीतून केले. आस्था कडक हिने भविष्याचा वेध घेतला. सजल चुनारकर हिने ‘मी युवती नव्या युगाची...’ या आशयाची कविता लिहून आजच्या नारीशक्तीचे प्रतिबिंब यात उमटविले. अनुज गुप्ता या विद्यार्थ्याने परिस्थितीमुळे निराश झालेल्या, खचलेल्या युवावर्गासाठी अतिशय प्रेरणादायी कविता रचली. ‘है तुम्हे डर तो सामना करो...’ असा त्याचा कवितेचा आशय होता. सृष्टी ठाकरे हिने संस्काराने मानव कसा घडतो, या विषयावर लिहिलेल्या लेखात दोन पोपटांची अतिशय गुणकारी गोष्ट कथन केली.
ऐश्वर्या मोरोणे हिने आपल्याला भविष्यात काय नावीन्यपूर्ण करायचे आहे, तिने निवडलेले करिअर किती विस्तीर्ण आहे. यासंदर्भात करिअर मार्गदर्शन केले. तुषार देवते या विद्यार्थ्यानेसुद्धा भविष्यातील अपेक्षा व्यक्त केल्या. सार्थक मेहर यानेसुद्धा आपल्या लेखातून भविष्याचा वेध घेतला. प्रथमेश ओगले याने छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी आपल्या लेखणीतून व्यक्त केली. अनुप नेरकर याने वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. तोशिब अलोणे याने स्वच्छ भारत अभियानाबाबतच्या भावना आपल्या लेखणीतून व्यक्त केल्या.
ऋषिकेश पुंडे याने शेतकºयांची व्यथा एका कवितेतून मांडली. पूजा चौधरी, ईशा मोलगुलवार या विद्यार्थिनींनी लिहिलेल्या लेखातून शाळेचे गुणगान केले. आर्यन हेडाऊ याने ‘सेव्ह ट्री, सेव्ह लाईफ’ या विषयावर चित्र साकारून आपल्या बालभावना व्यक्त केल्या. तर आदित्य वसू याने पाण्याचे महत्त्व एका चित्रातून विशद केले. साची अरमरकर या चिमुकलीने लालूप्रसाद यादव यांचे कार्टुन साकारले. पृथा सिरास हिने कुंचल्यातून निसर्गाचे प्रतिबिंब उमटविले. मनीष पवार याने बालकांचा आवडता डोरेमोन साकारला.