बाल्या बिनेकर हत्याकांड : आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 08:55 PM2020-09-28T20:55:45+5:302020-09-30T01:14:27+5:30

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नागपुरातील बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी सोमवारी दुपारी अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. पोलिसांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

Balya Binekar murder: Accused remanded in police custody till October 5 | बाल्या बिनेकर हत्याकांड : आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बाल्या बिनेकर हत्याकांड : आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देकडेकोट बंदोबस्तात न्यायालयात केले हजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नागपुरातील बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी सोमवारी दुपारी अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. पोलिसांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या बोले पेट्रोल पंपाजवळ आरोपी चेतन सुनील हजारे, रजत राजा तांबे, भारत राजेंद्र पंडित आणि आसीम विजय लुडेरकर तसेच त्यांच्या एका साथीदाराने
बाल्या ऊर्फ किशोर एकनाथ बिनेकर याची भीषण हत्या केली होती. या गुन्ह्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली असून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचा मुख्य आरोपी चेतन सुनील हजारे (३०, रा. बारा सिग्नल, बोरकर नगर, इमामवाडा) तसेच रजत तांबे, आसीम लुडेरकर आणि भारत पंडित या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांना रविवारी रात्री सीताबर्डी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सीताबर्डी पोलिसांनी आज दुपारी २ च्या सुमारास आरोपींना अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. गुन्ह्याच्या संबंधाने आरोपींकडून त्यांचे साथीदार आणि शस्त्रांसंबंधी माहिती घ्यायची आहे, असे सांगून पोलिसांनी पीसीआरची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी ग्राह्य धरत आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कस्टडी मंजूर केली.

न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त
आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे लोकभावना संतप्त आहेत. रविवारी बाल्याच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या भावना संतप्त होत्या. ते लक्षात घेत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस उपायुक्त विनिता शाहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने हे स्वत: न्यायालय परिसरातील बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. रस्त्यावरही गुन्हे शाखेतील पोलिस साध्या वेशात मोठ्या संख्येत हालचाली टिपत होते.

Web Title: Balya Binekar murder: Accused remanded in police custody till October 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.