उमरेडच्या शेतकऱ्याने फुलविले बांबूवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:29+5:302021-05-28T04:07:29+5:30

अभय लांजेवार उमरेड: सभोवताल झाडे. काटेरी झुडपांचा वेढा. संपूर्ण शेतशिवार पडीत. वीज तर कोसोदूर. त्यातच नांद प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा जबरदस्त ...

The bamboo plantation blossomed by the farmer of Umred | उमरेडच्या शेतकऱ्याने फुलविले बांबूवन

उमरेडच्या शेतकऱ्याने फुलविले बांबूवन

Next

अभय लांजेवार

उमरेड: सभोवताल झाडे. काटेरी झुडपांचा वेढा. संपूर्ण शेतशिवार पडीत. वीज तर कोसोदूर. त्यातच नांद प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा जबरदस्त फटका. अशा बिकट परिस्थितीत १५ वर्षे सोयाबीनसह अन्य पारंपरिक पिकांवरच लक्ष केंद्रित केले. ‘ना नफा, ना तोटा’ यात १५ वर्षे गेली. अशातच बांबूच्या उत्पादनाचा विचार पुढे आला. तब्बल २४ एकरात वनशेतीचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. उमरेड निवासी रमेश प्रभाकर डुंभरे या शेतकऱ्याने ही किमया साधली. येथून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलापार-नाड (ता.भिवापूर) शिवाराच्या मध्यवर्ती व घनदाट परिसरात रमेश डुंभरे यांची शेती आहे. २४ एकरापैकी १७ एकरात बांबू वन त्यांनी फुलविले आहे. रमेश डुंभरे दागिण्यांच्या कलाकुसरीचे काम करतात. अशातच मित्र परिवाराने त्यांना हिंमत दिली. २००० ला तब्बल २४ एकर शेती घेतली. या पडीत शेतात १५ वर्षे पारंपरिक पिके घेतली. नदीकिनारी शेती असल्याने पूरपरिस्थितीमुळे संपूर्ण पीक मातीत जात होते. दरवर्षी हेच दुखणे होते. अशातच पूर आणि हवामानाचा अभ्यास करीत बांबूचे उत्पादन करायचे ठरले. गडचिरोली, वड्याळी, नाशिक, कोल्हापूर असा संपूर्ण बांबूपट्टा पिंजून काढला. २०१८ ला नागपूरला बांबू विकास महामंडळ स्थापन झाले होते. त्यांच्याकडूनच सुमारे ४ हजार बेने आणले. दोन रांगेतील अंतर १० बाय १० ठेवले. मधातील एक रांग २० फुटांची आणि त्यात निलगिरीचे झाडे लावली. सातत्याने पाण्याची व्यवस्था या वनशेतीसाठी महत्त्वाची आहे. यामुळे विजेचीही समस्या सोडविली. रात्रंदिवस एक केला. आता या बांबूला तीन वर्षे झाले. साधारणत: ४ वर्षानंतर बांबू कापणीला येत असते. सध्या १७ एकरातील बांबू लक्षवेधी ठरत आहे. माझ्या या प्रवासात पत्नी रिंकू, डॉ. विजय इल्लुरकर, राजू चव्हाण, सुधाकर खानोरकर, शेखर भांडारकर आदींचे सहकार्य मोलाचे ठरले, असे रमेश डुंभरे यांनी सांगितले.

निलगिरी आणि सीताफळ बांबूसोबतच

रमेश डुंभरे यांनी उर्वरित ७ एकरात निलगिरी आणि सीताफळाचाही प्रयोग केला आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या ४ ते ५ हजार निलगिरीच्याही झाडांची वाढ तारीफेकाबीलच आहे. शिवाय सीताफळांचीही लागवड शेतात अध्येमध्ये करीत या शेतकऱ्याने वनशेतीचा वसा जपला आहे.

---

रानडुकरांचा त्रास

परिसरात रानडुकरांचा त्रास अधिक आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना बांबूचा प्रयोग करावयाचा आहे. त्या शेतकऱ्याने सर्वप्रथम आपल्या शेताला सोलर कूंपन ताराची सुरक्षा गरजेची आहे. आधी सोलर लावा आणि मगच लागवण करा. बांबूची कोंबे निघाल्यानंतर रानडुक्कर ही कोंब उपटून फेकतात. यामुळे नुकसान होते. बांबू उत्पादनासाठी एकरी वर्षाला एक लाख रुपयांचा खर्च लागतो.

Web Title: The bamboo plantation blossomed by the farmer of Umred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.