बांबूच्या ‘वेस्ट’ला बनविणार ‘बेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:17+5:302021-05-29T04:08:17+5:30

अभय लांजेवार उमरेड : केवळ कागद तयार करण्यासाठीच बांबूचा उपयोग होतो असे नाही, तर औषधी गुणधर्म असलेला बांबू मनुष्यासाठी ...

Bamboo 'West' to be 'Best' | बांबूच्या ‘वेस्ट’ला बनविणार ‘बेस्ट’

बांबूच्या ‘वेस्ट’ला बनविणार ‘बेस्ट’

Next

अभय लांजेवार

उमरेड : केवळ कागद तयार करण्यासाठीच बांबूचा उपयोग होतो असे नाही, तर औषधी गुणधर्म असलेला बांबू मनुष्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. या बहुगुणी बांबूचा प्रत्येक घटक उपयोगी ठरावा; तसेच बांबूच्या ‘वेस्ट’पासून ‘बेस्ट’ तयार करण्याचा संकल्प उमरेड येथील रमेश प्रभाकर डुंभरे यांचा आहे. विदर्भाच्या मातीत हे स्वप्न येत्या दोन-तीन वर्षांत साकारण्यासाठी रमेश डुंभरे दिवसरात्र एक करीत मेहनत घेत आहेत. वनशेतीतून लवकरच लघुउद्योग उभारण्याचा ध्यास त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.

उमरेडपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलापार-नाड (ता. भिवापूर) या शेतशिवारातील २४ एकरांतील वनशेतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. १७ एकरांत बांबू, तर उर्वरित शेतात निलगिरी व सीताफळ आहेत. येत्या वर्षभरात बांबूचे पहिले उत्पादन निघेल. अशातच आता बांबूवनातील प्रत्येक घटकाचा उपयोग झाला पाहिजे, यासाठी रमेश डुंभरे प्रयत्नरत आहेत. जमिनीतील कोंबापासून वाढ होणाऱ्या बांबूत कोवळे कोंब असतात. आडव्या फांद्या तसेच तलवारीच्या आकारासारख्या पानांतसुद्धा औषधी गुणधर्म असतो. बांबूच्या बिया भाताप्रमाणे शिजवून खातात. कोवळ्या बांबूचे लोणचे घालतात व त्याची चटणीसुद्धा तयार करतात. बांबूच्या कोवळ्या भागांचा उपयोग श्वसनविकारावरसुद्धा भारतातील काही भागांत केला जातो. मोठी हॉटेल्स, मॉलमध्ये बांबूपासून विविध डिश तसेच रुचकर खाद्यपदार्थ तयार करतात. सोबतच जळाऊ म्हणून उपयोगी ठरणारे पॅलेट आणि ब्रिक्सची निर्मितीसुद्धा यातूनच करण्याची योजना आहे. परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या दोन-तीन वर्षांत हा लघुप्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार आहे, अशी बाब रमेश डुंभरे यांनी व्यक्त केली.

बांधकामासाठीसुद्धा मोठ्या बांबूचा उपयोग होतो. टोपल्या, करंड्या, हारे, सुपे, पडदे, आदी स्वयंपाकघरातील साहित्य तसेच फर्निचर सजावटीसाठीसुद्धा बांबू मोलाचा ठरत असल्याने शासनाने वनशेतीला आर्थिक बळ दिल्यास नक्कीच शेतकऱ्यांसाठी वनशेती वरदान ठरेल, असा विश्वासही डुंभरे यांनी व्यक्त केला. बांबू विकास महामंडळाकडून वा शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ मला मिळालेले नाही. स्वबळावर हा प्रकल्प मी सुरू केला आणि त्याला योग्यरीत्या आकारही दिला.

शेतपिकात समावेश करा

बांबूचा समावेश शेतवर्गीय पिकात होत नाही, या कारणाने त्याला कर्जसुद्धा मिळत नाही. एकरी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च बांबूसाठी येतो. शिवाय चार वर्षांनंतर पहिले उत्पादन हाती येते. शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यानेच शेतकरी वर्ग या उत्पादनाकडे वळत नाही. कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांबूचा वापर होत असताना शासन यावर लक्ष केंद्रित का करीत नाही, असाही सवाल विचारला जात आहे. शेतवर्गीय पिकात बांबूचा समावेश करावा, अशी मागणी रमेश डुंभरे यांनी केली आहे.

Web Title: Bamboo 'West' to be 'Best'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.