मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना बंदी : मनपा आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 07:42 PM2020-11-10T19:42:55+5:302020-11-10T19:47:41+5:30
Big sound crackers ban, nagpur news कोविड बाधितांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके (जसे सुतळी बॉम्ब इ.) फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी साजरी करताना कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये, उद्याने, वृद्धाश्रम, शाळा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजाराची ठिकाणे, शासकीय तथा निमशासकीय कार्यालये यासह मनपाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘सायलेंट झोन’मध्ये कोणत्याही प्रकारची फटाके फोडता येणार नाही. कोविड बाधितांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके (जसे सुतळी बॉम्ब इ.) फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी जारी केले.
दिवाळी तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. हा आनंद साजरा करताना इतरांसाठी तो दु:खाचा ठरू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. परंतु बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. ही अत्यंत चुकीची बाब आहे. सध्या शहरात कोविडचा प्रादुर्भाव कमी असला तरी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
फटाके, दिवे लावताना सॅनिटायझर टाळा
कोविडच्या अनुषंगाने वापरण्यात येणारे सॅनिटायझर दिवाळीमध्ये धोकादायक ठरू शकते. सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने फटाके फोडताना आणि दिवे लावताना सॅनिटायझरचा वापर कुणीही करू नये. हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरऐवजी साबण किंवा हॅण्डवॉशचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फटाक्यांचा वापर टाळा
फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढते, त्यामुळे जनसामान्यांसह प्राणिमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पुढे दिसून येतो. वायू प्रदूषणामुळे कोविड बाधितांना धोकाही निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी फटाक्यांचा कमीत कमी करावा, शक्यतो टाळावा. दिवाळीत फटाके न फोडण्याचेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.
दिवाळीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सामुदायिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
दिवाळी पहाट व अन्य कार्यक्रम ऑनलाईनरीत्याच आयोजित करण्याला अनुमती.
नियमभंग करणारे, मास्क योग्यप्रकारे न लावणे, रस्त्यावर थुंकणे, विना परवानगी कार्यक्रम, गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.
नियमाचे उल्लघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल.