खासगी शिकवणी वर्गांवर बंदी घालावी

By admin | Published: July 31, 2016 02:35 AM2016-07-31T02:35:50+5:302016-07-31T02:35:50+5:30

आज शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. संस्थाचालक शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी थाटून बसले आहेत.

Ban private tuition classes | खासगी शिकवणी वर्गांवर बंदी घालावी

खासगी शिकवणी वर्गांवर बंदी घालावी

Next

मुक्तचर्चा : शिक्षक संघटना, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांची मागणी
नागपूर : आज शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. संस्थाचालक शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी थाटून बसले आहेत. त्याचवेळी खासगी शिकवणी वर्गाच्या स्वरूपातील रोगाने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला गिळंकृत केले आहे. त्यामुळे संस्थाचालकांची ही दुकानदारी बंद करण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करून खासगी शिकवणी वर्गांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थ्यांनी केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्यावतीने ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेतील अपप्रवृत्तीला जबाबदार कोण?’ या विषयावर शनिवारी ‘मुक्तचर्चा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा सूर पुढे आला. शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलाच्या कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘नुटा’ या शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल ढगे होते. तर या चर्चेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस डॉ. प्रमोद मुनघाटे, प्राचार्य रेखा दंडिगे-घिया, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या शहर अध्यक्ष पूजा चौधरी, रंजना कावडे, विजय खडसे, दीपेंद्र बेंद्रे, रमेश बिरेकर, राजेंद्र गंगोत्री, ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत उपाध्यक्ष कल्पना तिवारी व अनंत तुमडे यांनी भाग घेतला होता. यावेळी नामदेव सास्ते यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक कडू अनुभव कथन केले. दरम्यान ते म्हणाले, आज कॉन्व्हेटच्या माध्यमातून आपणच आपल्या मुलांना कुठे नेतो आहे, याचा विचार झाला पाहिजे. विदर्भ हा शिक्षणात दिवसेंदिवस मागे पडत आहे. शिवाय त्यामधील नागपूर हे शिक्षणाच्या बाजारीकरणाचे केंद्र झाले आहे. शिक्षण क्षेत्रात सर्रास दुकानदारी सुरू झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते सरकार मात्र गप्प आहे. खासगी शिकवणी वर्गामुळे विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयांत येणे सुद्धा बंद केले आहे. मोठमोठ्या शाळांनी आणि या खासगी शिकवणी वर्गांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण सुरू केले आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थीच जात नसताना त्या सर्व शाळा नियमित चालत असून, शिक्षकांना सुद्धा गलेलठ्ठ पगार मिळत आहे. त्यामुळे सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी ‘बायोमेट्रिक सिस्टीम’ लावून, ज्या शाळेत विद्यार्थीच येत नसेल, तेथील शिक्षकांना पगारच दिला जाऊ नये. असेही परखड मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य रेखा दंडिगे-घिया यांनी केले.(प्रतिनिधी)

पालकांनी आवाज उठवावा
अलीकडे प्रत्येक शाळा-महाविद्यालय शालेय साहित्य विक्रीचे दुकान थाटून बसले आहेत. या माध्यमातून विद्यार्थी व पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. विद्यार्थ्यांना शाळेतूनच शालेय साहित्य खरेदीचे बंधन घातले जात आहे. हे चूक असले तरी याविरुद्ध तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नाही. मात्र पालकांनी याविरुद्ध आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन यावेळी ग्राहक पंचायतीच्या विदर्भ प्रांत उपाध्यक्ष कल्पना तिवारी यांनी केले.
शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला
शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियुक्त्यांमधून प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा सुद्धा घालावत आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ संस्थाचालकांकडून शिक्षकांच्या नियुक्त्यांचे अधिकार काढून, सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून (सीईटी) करण्यात याव्या, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागपूर विभाग प्रमुख पूजा चौधरी यांनी केली.

 

Web Title: Ban private tuition classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.