कानठाळ्या बसविणारा आवाज, लेझर लाईटवर प्रतिबंध घाला
By निशांत वानखेडे | Published: September 7, 2024 06:05 PM2024-09-07T18:05:47+5:302024-09-07T18:06:31+5:30
Nagpur : ग्रीन प्लॅनेट साेसायटीची सरकारकडे मागणी
निशांत वानखेडे, नागपूर
नागपूर : ध्वनी प्रदूषणाविराेधात कायदा असूनही पाेलीस व जिल्हा प्रशासन त्याची अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांना त्रास हाेताे. अलीकडे लेझर लाईटचे समाजात फॅड आलेले आहे. या डाेळ्यांवर विपरित परिणाम करणाऱ्या लेझर लाईट व कानठाळ्या बसविणाऱ्या आवाजावर सरसकट प्रतिबंध घालण्याची मागणी ग्रीन प्लॅनेट साेसायटीने सरकारकडे केली आहे.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा २००० अस्तित्वात आहे. त्यात कडक नियम घालून दिलेले आहेत, पण लाेक त्यांचे पालन करीत नाही. दवाखाने, शाळा, न्यायालये अशा संवेदनशील ठिकाणी मोठा आवाज करू नये असे नियम आहेत. नियमाप्रमाणे उद्योग क्षेत्रात ७०-७५ डेसिबल, व्यावसाईक क्षेत्रा ५५-६५ आणि रहिवासी क्षेत्रात ४५-५५ डेसिबल आणि सायलेन्स झोनमध्ये ४० ते ५० डेसिबलची मर्यादा आहे. सर्वसाधारण मर्यादा ६० डेसिबल असावी. परंतू सन आणि उत्सवात डीजेचा आवाज १०० डेसिबल किंवा त्याहून अधिक असताे. याविराेधात कठाेर कारवाई हाेत नाही. सरकारने कायद्याच्या कठाेर अंमलबजावणीसाठी पाऊल उचलावे, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
ध्वनी प्रदूषणाचे परिणाम
कानाचे पडदे फाटणे, कानात सतत आवाज येत असणारा टीन्नीटसं विकार, रक्त दाब वाढणे, हॉर्ट अटॅकचा धाेका आणि मानसिक समस्या निर्माण होतात. घटनेच्या क्रिमिनल प्रोसिजर कोड, सेक्शन १३३ नुसार सार्वजनिक ठिकाणी आवाजाचा गोंधळ घालून लोकांना त्रास देणे हा गुन्हा आहे. इंडियन पिनल कोड चॅप्टर १४- कलम २६८, २८७, २९०, २९१ आणि २९४ नुसार अश्या नागरिकावर कारवाही करता येते.
लेझर लाईटच्या वापरावर हवे नियंत्रण
- लेझर लाईट हे डोळ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे.
- व्हीझीबल आणि इन्फ्रारेड लाईट, ४०० ते १४०० नानोमिटर लेझर लाईट बीम ही डोळ्याच्या रेटीनासाठी धोकादायक आहे.
- यामुळे डोळ्याच्या रेटीनल, फोटो केमिकल आणि कॉर्नियलला न भरून निघणारी इजा होते.
- ४००-५०० नेनोमिटर रेंज मधील अर्गोन आणि व्हेग लेझर हे विशेषता डोळ्यासाठी धोकादायक आहे.
- क्लास २ व्हीसिबल लाईटच्या सतत वापरानेसुद्धा धोका होऊ शकतो.
- सार्वजनिक ठिकाणी वापरल्यास विमान संचालनासाठी सुद्धा धोकादायक असल्याने डीजीसीएने त्यावर बंदी घातली आहे.