उपराजधानीतील मनोरुग्णांनी फुलवली केळीची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:06+5:30
नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांनी अडीच एकरात ९७५ केळीची रोपे लावली. उत्पादनाचे हे पहिलेच वर्ष असले तरी ३०० टन केळीचे पीक आले आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शीच मानसिक संघर्ष सुरू आहे. त्यांच्या उपचारात हातभार लागावा म्हणून त्यांना आवडेल ते काम करू देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. यातच अनेक रुग्ण हे शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेती यांच्याशी जोडले तर ते लवकर बरे होतात. याच अनुभवावर गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या थोड्याशा मेहनतीवर अडीच एकरात केळीची बाग फुलली आहे. या जीवांना थोडे समाधान, सृजनाचा आनंद मिळत आहे. बरे झालेल्या मनोरुग्णांचा या माध्यमातून पुनर्वसनाचा प्रयत्नही होत आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील हा प्रयत्न राज्यात ‘मॉडेल’ म्हणून पाहिले जात आहे.
एकदा रु ग्ण मनोरु ग्णालयात दाखल झाला की श्वास थांबेपर्यंतचं आयुष्य दगडी भिंतीच्या मागे असते, असे बोलले जाते. परंतु, उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातील चित्र वेगळे आहे. मनोरु ग्णालयातील विविध सामाजिक उपक्र मातून मनोरु ग्णांना समाजाशी जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या रुग्णालयात पुरु ष व महिला मिळून ६०० वर रुग्ण दाखल आहेत. यातील काही बरे झालेले, शेतीकामाची आवड असणाऱ्या मनोरुग्णांना शेतीचे प्रशिक्षण देत गेल्या वर्षी भाजीपाल्याची शेती करण्यात आली. तब्बल २१०० किलो मेथी, पालक व कोथिंबीर याचे पीक काढण्यात आले. या भाजीपाल्यांचा रोजच्या जेवणात समावेश करण्यात आला. मिळालेले यश पाहता केळीची बाग लावण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. अडीच एकरात ९७५ केळीची रोपे लावण्यात आली. उत्पादनाचे हे पहिलेच वर्ष असले तरी ३०० टन केळीचे पीक आले. भरघोस मिळालेल्या पिकाने केवळ रुग्णालय प्रशासनच नाही तर रुग्णांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
१४६ मनोरुग्णांना दिले शेतीचे प्रशिक्षण
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी सांगितले, टाटा ट्रस्टच्या ‘उडाण’ या प्रकल्पाच्या मदतीने मनोरुग्णांसाठी शेती प्रशिक्षण उपक्रम हाती घेण्यात आला. शेती व फळबागेचा सांभाळ करण्यासाठी रुग्णालयाचे स्वत:चे माळी आहेत. शेतीची आवड असणाऱ्या रुग्णांना ते निंदण, वखरणपासून तर भाजीपाल्याचे रोप टाकण्यापर्यंतचे प्रशिक्षण देतात. अनेक रुग्ण गावखेड्यातील असल्याने ते यात रमतात. यामुळेच शेतीतून भाजीपाला काढण्यास व फळबाग फुलविण्यात यश आले आहे. आतापर्यंत १४६ मनोरुग्णांना शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
रुग्णांच्या खात्यात पैसे होणार जमा
मनोरुग्णालयाच्या शेतीतून मिळालेल्या ३०० टन केळीचे पीक फळ व्यावसायिकाला विकले जाणार आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून खर्च वगळून उर्वरित पैसा केळीबागेसाठी मदत करणाऱ्या मनोरुग्णांच्या खात्यात जमा केला जाणार आहे, असेही डॉ. थोरात यांनी सांगितले.
रुग्णांना प्रशिक्षण देऊन पुनर्वसनाचा प्रयत्न
औषधोपचारांच्या क्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाली. यामुळे उपचाराने बरे होणाऱ्या मनोरुग्णांची संख्याही मोठी आहे. परंतु मनोरु ग्ण असा शिक्का बसल्याने फार कमी नातेवाईक त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन जातात. यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना शेतीसह इतरही विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असतो.
-डॉ. माधुरी थोरात
वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरु ग्णालय