विदर्भात बंद शांततेत; चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:29 PM2018-08-09T21:29:17+5:302018-08-09T21:30:02+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भात अनेक शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी ठोक मोर्चे काढण्यात आले. रक्ताच्या स्वाक्षरीचे निवेदन आणि मुंडण आंदोलनही छेडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भात अनेक शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी ठोक मोर्चे काढण्यात आले. रक्ताच्या स्वाक्षरीचे निवेदन आणि मुंडण आंदोलनही छेडण्यात आले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शाळा- महाविद्यालये बंद राहिली, काही ठिकाणी बाजारपेठाही बंद राहिल्या.
उपराजधानीत बंदला संमिश्र प्रतिसाद
नागपूर : सकल मराठा समाजाचा क्रांती ठोक मोर्चा आणि आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. सीताबर्डी, महाल, इतवारी, गांधीबाग, मस्कासाथ, सक्करदरा, मानेवाडा या भागातील बाजारपेठा बंद होत्या. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ महिला आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत नारेबाजी केली व सरकारचे लक्ष वेधले.
सकाळी १० वा. महाल गांधीगेट येथे महाआरतीनंतर आंदोलनाला सुरुवात झाली. तत्पूर्वी शहीद मेजर कौस्तुभ राणे, उमेश चौबे आणि काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अमरावतीत सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा
सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून शाळा-महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठान, बससेवा, राज्य मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग बंद होते. नागरिकांनी स्वयंस्फूर्त सहकार्य केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. शहरात मराठा बांधवांनी आपापल्या परिसरात १०० टक्के बंद पाळून मध्यवर्ती ठिकाण राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने ठिय्या दिला. शासन निषेधाच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठ, एमआयडीसी, शाळा-माहाविद्यालये, राज्य व राष्ट्रीय महामार्ग सकाळपासून बंद होते. जिल्हा ग्रामीणमध्ये चौदाही तालुक्यांमध्ये १०० टक्के बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळपासून सर्व तालुका मुख्यालयांसह गावागावांत उस्फूर्तपणे बंद होता. यावेळी सर्वपक्षीय मराठा समाज बांधवांनी बंदमध्ये सहभाग नोंदवून आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.
यवतमाळ जिल्ह्यात मराठा, धनगर आणि मुस्लीम बांधव एकत्र
जिल्ह्यात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी आयोजित करण्यात आलेला ठोक मोर्चाही शांततेत पार पडला. दारव्हा येथे मराठा, धनगर आणि मुस्लीम बांधव एकत्रच रस्त्यावर उतरले होते. पुसदमध्ये रक्त स्वाक्षरीचे तर शेंबाळपिंपरीत मुंडण आंदोलन करण्यात आले. यवतमाळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅली काढून शहर बंदचे आवाहन करण्यात आले. बसस्थानक चौकात समाजबांधवांनी ठिय्या दिला. नोव्हेंबरपर्यंपर्यंत शासनाने आरक्षण न दिल्यास ‘चूल बंद’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
बंदमुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. आॅटो चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. तर एकही एसटी यवतमाळ आगारातून सोडण्यात आली नाही. दवाखाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. उमरखेड तालुक्यातील मराठा बांधवांनी नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक मार्लेगाव फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. आंदोलनामुळे अडून पडलेल्या वाहनधारकांना, प्रवाशांना, मजुरांना आंदोलक मराठाबांधवांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. घाटंजी, राळेगाव, नेर तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. सवना (ता. महागाव) येथे रास्तारोको आंदोलन झाले.
वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव आदी भागात मराठा आंदोलन शांततेत पार पडले. व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. पुलगाव-आर्वी मार्ग विरूळ (आकाजी) फाट्याजवळ आंदोलकांनी रोखून धरला होता. वर्धा येथे परिवहन महामंडळाची बससेवा सकाळी ११ वाजतानंतर तर हिंगणघाट येथे सकाळी ६ वाजतापासून बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत पोहचविणाऱ्या सर्व स्कूल बसेस, आॅटो व व्हॅन बंदमध्ये सहभागी असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. अनेक शाळा महाविद्यालयांनी पहिलेच सुट्टी जाहीर केली होती. वर्धा येथे शिवाजी चौकात जाहीर सभा घेवून आंदोलकांनी महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
गोंदियात कडकडीत बंद
मराठा समाजबांधवांनी गुरूवारी सकाळी ८ वाजता गोंदिया शहरात मोटरसायकल रॅली काढली. शाळा- महाविद्यालये, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्यातील काही मार्गावरील बसफेऱ्या सकाळी ११ वाजतापर्यंत बंद होत्या. नेहरू चौकातून मराठा समाज समितीच्या नेतृत्त्वात मराठा समाजबांधवानी रॅली काढून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन दिले.
भंडारा येथे बंदला संमिश्र प्रतिसाद
भंडारा येथे सकल मराठा समाजाने मोटर सायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. जिल्हाधिकारी कार्यालय चौकात आंदोलनकर्त्यांनी पाच तास ठिय्या दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भंडारा नागपूर मार्गावरील एसटी बससेवा सकाळी ८ वाजतापासून दुपारी ३ वाजतापर्यंत बंद होती.
गडचिरोलीत बंदचा परिणाम नाही
गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मराठा आरक्षण बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. बाजारपेठ सुरळीतपणे सुरू होती. कुठेही आंदोलन नसल्यामुळे एसटी बसच्या फेऱ्याही सुरू होत्या. केवळ नागपूरकडे जाणा काही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.
पश्चिम वऱ्हाडात चांगला प्रतिसाद
पश्चिम वऱ्हाडात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्हा मुख्यालयासह तालुका स्तरावरची शहरे, मोठ्या गावांची बाजारपेठ बंद होती. राज्य परिवहन महामंडळाची एकही बस दुपारी ४ वाजतापर्यंत रस्त्यावर आली नाही. दरम्यान, बुलडाण्यात आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंडण केले, तर अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये सकल मराठा समाजाने आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर ठिय्या दिला होता. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक पे्रतयात्रा काढून दहनविधीही करण्यात आला.