नागपुरात बांगलादेशीने घातला लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:39 AM2018-08-29T10:39:49+5:302018-08-29T10:40:17+5:30

बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणाने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडवून दिली असताना ‘त्या’ चौघांव्यतिरिक्त पुन्हा एका घुसखोराचे खळबळजनक प्रकरण लोकमतच्या हाती लागले आहे.

Bangla Deshi man looted people in Nagpur by millions | नागपुरात बांगलादेशीने घातला लाखोंचा गंडा

नागपुरात बांगलादेशीने घातला लाखोंचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रचारकाच्या वेषात बेरोजगारांशी ओळखी वाढवल्या

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणाने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडवून दिली असताना ‘त्या’ चौघांव्यतिरिक्त पुन्हा एका घुसखोराचे खळबळजनक प्रकरण लोकमतच्या हाती लागले आहे. त्यानुसार, या घुसखोराने उत्तर नागपुरातील अनेक बेरोजगारांना विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून त्याने १५ ते २० लाख रुपये हडपल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.
रॉकी विमल बरुवा ऊर्फ रॉकी चौधरी (वय २६, मूळ पत्ता शहाबीनगर, बरुआपारा, रांगोनिया, जि. चिंत्ताग्राम, बांगलादेश), सुदर्शन नयन बरुवा ऊर्फ नयनसुमन तालुकदार अनंतमोहन (वय ३०, रा. शेगाटा धोपाचुरी, त. शतकानी. जि. चट्टाग्राम, बांगलादेश), विप्लब शिशिर बरुवा ऊर्फ विप्लब शिशिर तालुकदार (वय ३४, रा. शिरकुब, मोकिंचर माब्कली, जि. खटकग्राम, बांगलादेश) आणि प्रदीप चित्तरंजन बरुवा ऊर्फ नंदप्रिय तपन बरुवा (वय २८, रा. पुट्टीविला एमसरहाट, लोहागडा, जि. चट्टग्राम, बांगलादेश) हे चार बांगलादेशी घुसखोर सध्या गिट्टीखदान पोलिसांच्या कस्टडीत आहेत. त्यातील एक बांगलादेशातील एका दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे वृत्त लोकमतने वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांसोबत गुप्तचर यंत्रणांतील अधिकाऱ्यांनीही या चौघांची चौकशी केल्याची खास सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, एका पाचव्या घुसखोराची ठगबाजी लोकमतच्या हाती लागली आहे. त्यानुसार, रुपान बरुवा ऊर्फ उत्पल ऊर्फ हेमांद्री असे त्याचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी तो जरीपटक्यात राहत होता. नंतर त्याने आपले बस्तान गोरेवाड्यात हलविले. प्रारंभी प्रचारकाच्या वेषात फिरणाऱ्या रुपानने ठिकठिकाणच्या बेरोजगारांशी ओळखी वाढवल्या. त्यांना आपल्या जाळ्यात ओढून विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. फ्रान्स, जर्मन, थायलंड, मलेशिया, सिंगापूरमध्ये आपली अनेकांशी ओळख असून, त्या आधारे आपण मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष तो बेरोजगारांना दाखवत होता. अत्यंत गोडीगुलाबीने वागणाऱ्या ठगबाज बरुवावर विश्वास ठेवून जरीपटक्यातील विशांत दीपक मेश्राम, हरप्रित सिंग, संदीप सरदार आणि मोहित कराडे या युवकांनी त्याच्याकडे आपली शैक्षणिक कागदपत्रे सोपवली. प्रारंभी पासपोर्ट, व्हिसा बनविण्याच्या नावाखाली त्याने रक्कम उकळणे सुरू केले.
नंतर विदेशात लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याच्या बदल्यात स्वत:ला काय मिळेल, असा प्रश्न करून मेश्रामकडून आठ लाख तर अन्य तिघांकडूनही प्रत्येकी पाच ते आठ लाख असे एकूण २३ ते ३० लाख रुपये उकळले. १५ मे २०१५ ते १४ जानेवारी २०१६ या कालावधीत हा सर्व व्यवहार झाला.

गुन्हा दाखल, भुसावळला पलायन !
तरुणांना दोन वेळा सिंगापूरहून डिपोर्ट करण्यात आल्यामुळे आणि त्यांना तेथे नोकरी मिळण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्यामुळे तरुणांसह त्यांचे नातेवाईकही संतप्त झाले. तर, आपले पितळ उघडे पडल्यामुळे नागपुरात कानशेकणी होऊ शकते, हे ध्यानात घेऊन आरोपी रुपान नागपुरातून पळून गेला. पीडित तरुणांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, तो सापडता सापडेना. अनेक महिन्यानंतर तो भुसावळला दडून बसल्याची माहिती जरीपटका पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याच्या मुसक्या बांधल्या होत्या. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सध्या गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या घुसखोरांसोबत रुपान बरूवाचे काय संबंध आहे, ते तपासले गेल्यास पुन्हा नवीन माहिती उघड होऊ शकते.

सिंगापूरहून डिपोर्ट केले
सिंगापूरमध्ये तारांकित हॉटेल किंवा मॉलमध्ये मोठ्या हुद्याची आणि लठ्ठ पगाराची नोकरी मिळवून देण्याची रुपान बरुवाने बतावणी केली होती. त्यामुळे हुरळलेल्या या तरुणांनी मनोमन स्वप्नाची दुनिया रंगवली. ठरल्याप्रमाणे व्हिसा मिळताच संदीप वगळता २०१५ च्या अखेर नागपूर-मुंबई आणि तेथून सिंगापूरला गेले. तेथे सिंगापूर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विशांत मेश्रामसह तिघांनाही विमानतळावर चौकशीसाठी बाजूला घेतले. त्यांची कागदपत्रे तपासली. दोन दिवसांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर कसलेही ठोस कारण नसताना ते सिंगापुरात आल्याचे कारण दाखवत विशांतसह तिघांनाही विमानतळावरूनच भारतात परत पाठविले. परिणामी सर्व पीडित रुपानकडे गेले. त्याने त्यावेळी वेळ मारून नेली. दोन आठवड्यानंतर आपण स्वत: तुमच्यासोबत येतो असे सांगून त्यांना शांत केले. त्यानंतर आरोपी रुपान बरूवा या तिघांसह बँकॉकमध्ये गेला. तेथे दोन दिवस थांबल्यानंतर त्यांना सिंगापूरला घेऊन गेला. तेथे पुन्हा तसाच प्रकार घडला. त्यांना दुसऱ्यांदा विमानतळावरूनच डिपोर्ट करण्यात आले.

Web Title: Bangla Deshi man looted people in Nagpur by millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.