बांगलादेशी भंतेंची निर्दोष सुटका
By admin | Published: July 24, 2016 02:23 AM2016-07-24T02:23:50+5:302016-07-24T02:23:50+5:30
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. डी. फुलझेले यांच्या न्यायालयाने एका बांगलादेशी बौद्ध भंतेची सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका केली.
न्यायालयाचे मायदेशी पोहचविण्याचे पोलिसांना निर्देश
नागपूर : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. डी. फुलझेले यांच्या न्यायालयाने एका बांगलादेशी बौद्ध भंतेची सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका केली. तसेच या भंतेंना त्यांच्या मायदेशी पोहचवून देण्याचे निर्देश पोलिसांना दिले. घनानंद विभूतीभूषण बरुआ, असे या भंतेचे नाव आहे. ते बांगलादेशच्या बकरअलीबिल, चितगॉग येथील रहिवासी आहेत. गेल्या ११ आॅगस्ट २०१५ रोजी नंदनवन पोलिसांनी या भंतेंविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, भारतीय पासपोर्ट कायद्याच्या १२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. भंते घनानंद हे पर्यटक व्हिसा घेऊन श्रीलंकेतून भारतात आले होते.
नागपुरात येऊन त्यांनी नंदनवन भागातील सुजाता बौद्ध विहार येथे मुक्काम ठोकला होता. त्यांनी भारताचे पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी बनावट दस्तावेज संलग्न केले होते. न्यायालयात आरोपी भंते यांच्यावतीने अॅड. राजेंद्र पाटील, अॅड. नितीन भिसीकर आणि अॅड. यशवंत मेश्राम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)