बांगलादेशी घुसखोरांचे सर्वत्र तगडे ‘नेटवर्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:38 AM2018-08-30T11:38:22+5:302018-08-30T11:40:35+5:30

Bangladeshi intruders roam all the 'network' | बांगलादेशी घुसखोरांचे सर्वत्र तगडे ‘नेटवर्क’

बांगलादेशी घुसखोरांचे सर्वत्र तगडे ‘नेटवर्क’

Next
ठळक मुद्देअनेक ठिकाणी वास्तव्य पाळेमुळे शोधून काढण्याचे तपास यंत्रणांपुढे आव्हान

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घुसखोरी करून भारतात शिरलेल्या बांगलादेशींनी मध्य भारतात ठिकठिकाणी उधळी लावली आहे. नागपूरला येण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या करून अनेक ठिकाणी डेरा टाकलेला आहे. भारतात बिनबोभाट बेकायदा वास्तव्य करून या घुसखोरांनी ठिकठिकाणच्या प्रशासनासोबत नागरिकांशीही बनवाबनवी केली आहे. त्यामुळे घुसखोरांच्या नेटवर्कची पाळेमुळे शोधून काढण्याचे तपास यंत्रणांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, या घुसखोरांनी पोलीस तपासात दिलेल्या माहितीची गिट्टीखदान पोलीस, गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि गुप्तचर यंत्रणा आपापल्या पद्धतीने शहानिशा करीत आहेत.
नागपुरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर वास्तव्याला असल्याचे कळल्यानंतर विशेष शाखेने तब्बल दोन महिने कसून तपास केला. त्यानंतर २३ आॅगस्टला गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करणारे रॉकी विमल बरुवा ऊर्फ रॉकी चौधरी (वय २६, मूळ पत्ता शहाबीनगर, बरुआपारा, रांगोनिया, जि. चिंत्ताग्राम, बांगलादेश), सुदर्शन नयन बरुवा ऊर्फ नयनसुमन तालुकदार अनंतमोहन (वय ३०, रा. शेगाटा धोपाचुरी, त. शतकानी. जि. चट्टाग्राम, बांगलादेश), विप्लब शिशिर बरुवा ऊर्फ विप्लब शिशिर तालुकदार (वय ३४, रा. शिरकुब, मोकिंचर माब्कली, जि. खटकग्राम, बांगलादेश) आणि प्रदीप चित्तरंजन बरुवा ऊर्फ नंदप्रिय तपन बरुवा (वय २८, रा. पुट्टीविला एमसरहाट, लोहागडा, जि. चट्टग्राम, बांगलादेश) या चौघांना अटक केली. ते सुरेंद्रगडमधील गांधी पुतळ्याजवळच्या दीनानाथ निखारे यांच्याकडे भाड्याने राहत होते. तीन दिवस त्यांची विशेष शाखेने कसून चौकशी केल्यानंतर त्यांना गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले. ते सध्या गिट्टीखदान पोलिसांच्या कस्टडीत आहेत. त्यांच्याकडून अनेक धक्कादायक खुलासेवजा माहिती उघड झाली आहे. या घुसखोरांकडे मतदार ओळखपत्रापासून आधारकार्डपर्यंत सर्वच कागदपत्रे आहेत. त्यावरून त्यांनी ते बांगलादेशी घुसखोर नसून भारतीय नागरिक असल्याचा दिखावा निर्माण करण्यात यश मिळवले होते.
त्यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगालसह अन्य राज्यात नेटवर्क निर्माण केले. नागपूरपूर्वी त्यांनी अनेक शहरात वास्तव्य केले आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वप्रथम हे कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे राहिले. तेथून त्यांनी रायपूर (छत्तीसगड) गाठले. तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांनी थेट मुंबईला धाव घेतली. मुंबईत बरेच दिवस काढल्यानंतर ते नागपुरात आले. अशाप्रकारे तीन राज्याच्या राजधानींच्या महानगरात त्यांनी बराच कालावधी मुक्काम ठोकला होता. त्या ठिकाणच्या वास्तव्यात त्यांनी काय उपद्रव केला, ते पुढे आलेले नाही. आम्ही धर्मप्रचारकाचे काम करीत होतो, असे ते पोलिसांना सांगत आहेत. मात्र, त्यांच्या कथनात किती सत्यता आहे, हा तपासाचा विषय ठरला आहे. गिट्टीखदान पोलीस, विशेष शाखा आणि गुप्तचर यंत्रणा त्याची स्वतंत्र चौकशी करीत आहेत.

खाण्यापिण्याचे वांदे अन् हवाई सफर
चार दिवसांच्या पोलीस कस्टडीत उल्लेखित घुसखोरांनी ‘बांगलादेशातून आम्ही रोजगाराच्या शोधात पळून आलो. आमचे तेथे खाण्यापिण्याचे वांदे होते’, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. घातलेल्या कपड्यांसह पळून आलेल्या या घुसखोरांनी वेगवेगळ्या वेळी थायलंड, मलेशिया, सिंगापूर यासारख्या देशात विदेशी सफर कशी केली. ही हवाई सफर करण्याएवढी त्यांची आर्थिक स्थिती कशी भक्कम झाली, असा प्रश्न आहे. या प्रश्नासह घुसखोरांनी कुठे कुठे कशा पद्धतीने उधळी लावली, त्याचाही शोध घेण्याचे तपास यंत्रणांपुढे आव्हान ठाकले आहे.

बाकीच्यांचे काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, हे केवळ चौघेच नव्हे तर असे अनेक बांगलादेशी घुसखोर नागपुरात बिनबोभाट वास्तव्य करीत आहेत. या चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्यासारखेच ऐषोआरामाचे जीवन जगणारे नागपुरातून पळून गेले. काहींनी आपले ठिकाण बदलवले. दरम्यान, या व अशाच प्रकारे अनेकांनी बनावट कागदपत्रे, पासपोर्ट तयार करून सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर विविध राज्याच्या प्रशासकीय यंत्रणांचीही फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.

Web Title: Bangladeshi intruders roam all the 'network'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.