नागपूरच्या वाठोड्यातील कुंटणखान्यावर आढळली बांगलादेशी वारांगणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 12:40 AM2021-01-19T00:40:31+5:302021-01-19T00:41:26+5:30
prostitution raid, crime news बांगलादेशी तरुणीसह दोघींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या वाठोड्यातील दाम्पत्यासह तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांगलादेशी तरुणीसह दोघींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या वाठोड्यातील दाम्पत्यासह तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. अभय शास्त्री घोंदमोडे (वय ४७), वैशाली ऊर्फ वर्षा अभय घोंदमोडे (वय ३७, रा. उमिया कॉलनी) आणि रूपा विजय राठोड (वय ४०, रा. मानवशक्तीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
सुप्रसिद्ध स्वामी नारायण मंदिराजवळच्या सदाशिवनगरात एका पॉश डुप्लेक्समध्ये उपरोक्त आरोपी वर्षभरापासून कुंटणखाना चालवत होते. त्याची कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथक प्रमुख, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कारवाईचा सापळा रचला. पोलिसांच्या पंटरने आरोपींसोबत संपर्क केला असता त्यांनी २ हजारात एक तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. ग्राहकाकडून सोमवारी सायंकाळी दोन तरुणींसाठी ४ हजार रुपये घेऊन आरोपींनी आपल्या डुप्लेक्समध्ये त्यांना प्रवेश दिला. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला विवस्त्र होताच दलालांनी संकेत दिले. त्यानुसार, एसएसबीच्या पथकाने तेथे छापा घातला. तेथे घोंदमोडे दाम्पत्य आणि दलाल रूपा राठोड या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रक्कम तसेच आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपिनरीक्षक मंगला हरडे, हवलदार अनिल अंबाडे, अजय पाैनीकर, भूषण झाडे, मनीष रामटेके, सुधीर तिवारी, सुजाता पाटील आणि प्रीती नेवारे यांनी ही कामगिरी बजावली.
चिमुकलीला सोडून ती करते वेश्याव्यवसाय
पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोघींची विचारपूस केली. तेव्हा त्यातील एक (वय ३६) नागपूरची तर दुसरी (वय २३) बांगलादेशी (नवरल, ढाका) असल्याचे उघड झाले. प्राथमिक चाैकशीत तिची करुण कहाणी पुढे आली. ती विवाहित असून तिला दीड वर्षाची चिमुकली आहे. घरची स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सहा महिन्यांच्या मुलीला सोडून ती सीमेवरून लपतछपत कोलकात्यात आली. तेथून वर्षभरापूर्वी नागपुरात आली. भाड्याच्या खोलीत ती येथे एकटीच राहते. ती वेगवेगळ्या दलालांच्या संपर्कात आहे. एका कॉलचे दलालाकडून तिला केवळ ५०० रुपये मिळतात. कधी दोन तर कधी तीन कॉल करून ती पैसे जमविते आणि बऱ्यापैकी रक्कम जमा झाल्यानंतर आपल्या नातेवाइकांना पाठवते. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून ती आपल्या नातेवाइकांच्या संपर्कात राहते.
विदेशी वारांगणांची वर्दळ
नागपुरात नेहमीच विदेशी वारांगणांची वर्दळ राहते. येथे वारंवार झालेल्या कारवाईत रशियन, नेपाळी वारांगणा पकडल्या गेल्या आहेत. टुरिस्ट व्हिजा घेऊन त्या भारतात येतात अन् मोठ्या हॉटेलमध्ये येऊन त्या वेश्याव्यवसाय करतात. आजच्या कारवाईत चक्क बांगलादेशी वारांगणा आढळल्याने आणि ती घुसखोरी करून भारतात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने पोलीस चक्रावले आहेत.