घुसखोरी करून नागपुरात आलेली बांगलादेशी महिला गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:16 AM2018-02-25T01:16:59+5:302018-02-25T01:17:19+5:30
घुसखोरी करून आल्यानंतर १८ वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला तहसील पोलिसांनी अटक केली. सालेहा परवीन अमजद हुसेन (वय ४१) असे तिचे नाव असून ती मोमीनपुऱ्यात राहत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घुसखोरी करून आल्यानंतर १८ वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला तहसील पोलिसांनी अटक केली. सालेहा परवीन अमजद हुसेन (वय ४१) असे तिचे नाव असून ती मोमीनपुऱ्यात राहत होती.
१ जानेवारी २००० रोजी सालेहा नागपुरात आली. येथे १८ वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करतानाच तिने येथे आधारकार्ड, शिधापत्रिका, पासपोर्ट आणि व्होटिंग कार्डही बनवून घेतले. या प्रकाराची माहिती तहसील पोलिसांना मिळाली. चौकशीअंती ती बांगलादेशी नागरिक असल्याचे आणि येथे ती अवैधपणे वास्तव्य करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने शनिवारी तिला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध नायक प्रमोद धोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१ भादंवि तसेच कलम १२ (ब) आणि पासपोर्ट अधिनियम कलम १४ (विदेशी व्यक्ती अधिनियम) गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. अशाप्रकारे अवैध वास्तव्य करणारे अनेक बांगलादेशी घुसखोर नागपुरात अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत, हे विशेष!
जाणे-येणेही सुरूच होते
पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर दुसरी एक धक्कादायक बाब उघडकीस आली. ती म्हणजे, सालेहा अधूनमधून मायदेशी बांगलादेशात जात होती अन् परत नागपुरात येत होती. तिच्याकडे दोन पासपोर्टही आढळून आले. ती १३ फेब्रुवारीलाच आपली मायदेशवारी करून नागपुरात परत आल्याचे पोलीस सांगतात. मोमीनपुऱ्यातील अनेक धनिक कुटुंबांकडे ती घरकाम करीत होती, असे तिने पोलिसांना सांगितले आहे.