नवनव्या कंपन्या स्थापन करून फसवित होता बंजारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 09:01 PM2020-09-16T21:01:19+5:302020-09-16T21:02:37+5:30
टॅक्सी मालकांना लाखो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या सुभाष बंजारा नवनव्या कंपन्या स्थापन करून नागरिकांना फसवित होता. अनेक काळापासून त्याचा गोरखधंदा सुरू असल्यामुळे तो फसवणूक करण्यात पटाईत होता. नागपुरात त्याने ४३५ टॅक्सी मालकांना फसविल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टॅक्सी मालकांना लाखो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या सुभाष बंजारा नवनव्या कंपन्या स्थापन करून नागरिकांना फसवित होता. अनेक काळापासून त्याचा गोरखधंदा सुरू असल्यामुळे तो फसवणूक करण्यात पटाईत होता. नागपुरात त्याने ४३५ टॅक्सी मालकांना फसविल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल होऊन ४८ तास उलटल्यानंतरही बंजाराचा काहीच सुगावा लागला नाही. परंतु त्याचे कुटुंबीयांना तो कुठे गेला याची माहिती आहे.
बंजारा आठवडाभरापूर्वी एलआयसी चौकातील गिरीश हाईट्समधील टॅक्सी ट्रॅव्हल कंपनी बंद करून पसार झाला आहे. त्याने जून महिन्यामध्ये फसवणुकीचा व्यवसाय सुरु केला होता. बंजारा टॅक्सी मालकांना एक रुपये प्रती किलोमीटरच्या भावाने पैसे देत होता. त्यामुळे ई-पास घेऊन ये-जा करणाऱ्यांची बंजाराकडे गर्दी झाली होती. जुलै महिन्यात ४० ते ५० टॅक्सीच्या आधारे बंजाराचा व्यवसाय सुरू होता. बंजाराने टॅक्सी मालकांना ऑगस्ट महिन्याच्या किरायाचे धनादेश दिले. त्याने धनादेश देतानाचे फोटो काढले. हे फोटो टॅक्सी मालकांच्या ग्रुपवर व्हायरल केले. बंजारातर्फे वेळेवर पैसे मिळत असल्यामुळे टॅक्सी मालकांना त्याच्यावर विश्वास पटला. ते बंजाराकडे आकर्षित झाले. बंजारा एका टॅक्सीवर शहरात संचालनासाठी ५५०० रुपये तसेच बाहेर संचालनासाठी १७५०० रुपये रजिस्ट्रेशन शुल्क घेत होता. त्याच्या जवळ शहरासाठी १५० तसेच बाहेरच्यासाठी २८५ टॅक्सींची नोंदणी झाली होती. त्यांच्याकडून ५८ लाख रुपये नोंदणी शुल्काच्या माध्यमातून मिळाल्याची माहिती आहे. क्षमतेपेक्षा अधिक टॅक्सी किरायाने घेतल्यामुळे बंजाराचा व्यवसाय बुडित निघाला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इशारा देऊन त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. बंजारा ठरलेल्या योजनेनुसार रजिस्ट्रेशनची रक्कम घेऊन पसार होणार होता. त्याच्याशी निगडित व्यक्ती यापासून अनभिज्ञ होत्या. आता त्यांना बंजाराच्या खऱ्या योजनेची माहिती मिळत आहे.
पत्नीही झाली सोबत फरार
बंजाराच्या व्यवसायात त्याची पत्नी रश्मी ही सुद्धा सहभागी आहे. त्याला सहा महिन्याची मुलगी आहे. तिलाही ते सोबत घेऊन गेले आहेत. त्याचा मुलगा आजी-आजोबा व मामा सोबत बंजाराच्या कळमना येथील किरायाच्या घरात राहतात. किरायाचे घर पाहून टॅक्सी मालकांना बंजारावर शंकाही आली. परंतु तो कळमनात बंगल्याचे काम सुरू असल्याचे सांगून त्यांना शांत करीत होता.