बँक लेखा परीक्षक भारतीय अर्थव्यवस्थेचे रक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:51+5:302021-04-24T04:07:51+5:30
नागपूर : भारतीय बँकिंग प्रणाली सक्षम असून भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे. त्यातच सीए बँकिंग प्रणालीच्या आर्थिक प्रगतीबाबत देशातील ...
नागपूर : भारतीय बँकिंग प्रणाली सक्षम असून भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे. त्यातच सीए बँकिंग प्रणालीच्या आर्थिक प्रगतीबाबत देशातील नागरिकांना विश्वास देतात. याच कारणामुळे सीए भारतीय अर्थव्यवस्थेचे रक्षक असल्याचे मत आयसीएआयच्या पश्चिम भारत क्षेत्रीय परिषदेचे अध्यक्ष सीए मनीष गाडिया यांनी व्यक्त केले.
आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे ‘जस्ट बिफोर ब्रँच ऑडिट’वर आयोजित सेमिनारमध्ये त्यांनी सीएंना मार्गदर्शन केले. यावेळी नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया उपस्थित होते. गाडिया म्हणाले, बँकेत आर्थिक घोटाळा आणि फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीएंवर अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. बँक लेखा परीक्षकांच्या तपासणीमुळे घोटाळ्यावर निर्बंध येते. यामुळे बँकेची सुरक्षितता वाढते. भारतीय बँकिंग प्रणालीत अधिक पारदर्शता आणण्यासाठी त्यांनी सीएंना प्रोत्साहन दिले.
डब्ल्यूआयआरसीचे उपाध्यक्ष दृष्टी देसाई यांनी सीएंच्या हितासाठी काम करणाऱ्या नागपूर शाखेचे अभिनंदन केले. नागपूर शाखेतर्फे विकसित बँक लेखा परीक्षा हेल्पडेस्क उत्तम आहे. त्यामध्ये बँक शाखा लेखा परीक्षेदरम्यान सीएंच्या मदतीसाठी विशेषज्ञ सीए पॅनलमध्ये आहेत. सचिव सीए अर्पित काबरा यांनी नागपूर शाखेला पश्चिम विभागात प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. कोषाध्यक्ष सीए जयेश कला यांनी बँक ऑडिटर्सला यावर्षी जास्त सतर्क राहण्याचे आवाहन केले.
सेमिनारमध्ये क्षेत्रीय परिषदेचे सदस्य सीए अभिजित केळकर, सीए डॉ. दिलीप सतभाई, सीए ऋषिकेश देशपांडे, सीए नितीन सारडा, नागपूर शाखेचे उपाध्यक्ष व ‘विकासा’ अध्यक्ष सीए जितेन सागलानी, माजी अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर व सीए किरीट कल्याणी, सचिव संजय एम अग्रवाल, उपाध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने आणि सीए सदस्य उपस्थित होते.