नागपुरात बँकेच्या महिला कॅशियरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 08:43 PM2019-11-23T20:43:56+5:302019-11-23T20:45:33+5:30
सिंडीकेट बँकेच्या महिला कॅशियरने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिंडीकेट बँकेच्यामहिला कॅशियरने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. प्रियंका राघोबाजी देवघरे (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. दरम्यान, प्रियंकाच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून, पोलीस चौकशी करीत आहेत.
प्रियंका गोळीबार चौकात राहत होती. ती सिंडीकेट बँकेच्या महाल शाखेत रोखपाल म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ती कर्तव्यावर जाते, असे सांगून घरून बाहेर निघाली. नेहमीची परत येण्याची वेळ संपूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद मिळत नसल्याने चिंताग्रस्त कुटुंबीय तिच्या शोधासाठी बाहेर पडले. रात्री १० च्या सुमारास गांघीसागर तलावाजवळ प्रियंकाची दुचाकी दिसल्याने तिचे पालक तिला आजूबाजूला शोधू लागले. दरम्यान, बाजूला नागरिकांचा मोठा घोळका दिसल्याने प्रियंकाचे नातेवाईक तिथे पोहचले असता त्यांना पाण्यातून बाहेर काढलेला प्रियंकाचा मृतदेह दिसला. तिच्या वडिलांनी लगेच बाजूच्यांना ओळख पटवून दिली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांना कळविण्यात आले. पीएसआय जाधव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दरम्यान, चांगल्या पगाराची बँकेतील नोकरी करणाऱ्या प्रियंकाने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट झाले नाही. कारण पुढे न आल्यामुळे उलटसुलट चर्चा केली जात आहे. आत्महत्येच्या कारणांची चौकशी केली जात असल्याची माहिती पीएसआय मंगला मोकाशी यांनी दिली आहे.
आणखी एकाची आत्महत्या
या घटनेच्या दीड तासापूर्वी रमेश नामक एका इसमाचा मृतदेह गांधीसागर तलावाच्या पाण्यात आढळला. प्रतीक विजय वंजारी यांनी दिलेल्या माहितीवरून एएसआय खांडरे यांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.