बँक कर्मचारी स्वत:च खराब करतात नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:29 AM2018-08-28T10:29:35+5:302018-08-28T10:32:12+5:30
बँक कर्मचाऱ्यांनी नोटांची काळजी घ्यायला पाहिजे. परंतु, ते स्वत:च नोटा खराब करीत आहेत. बऱ्याच बँक कर्मचाऱ्यांना नोटांवर लिहिण्याची सवय आहे.
फहीम खान।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँक कर्मचाऱ्यांनी नोटांची काळजी घ्यायला पाहिजे. परंतु, ते स्वत:च नोटा खराब करीत आहेत. बऱ्याच बँक कर्मचाऱ्यांना नोटांवर लिहिण्याची सवय आहे. अशा नोटा डिपॉझिट मशीनद्वारे स्वीकारल्या जात नाही. त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
वर्तमान परिस्थितीत बहुतेक बँकांनी ग्राहकांच्या सुविधेसाठी डिपॉझिट मशीन लावल्या आहेत. त्या मशीनद्वारे ग्राहक स्वत:च हव्या त्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करू शकतो. त्यामुळे बँकांमधील गर्दी कमी झाली आहे. ग्राहकांचा रांगेत उभे राहण्याचा त्रासही संपला आहे. परंतु, डिपॉझिट मशीन काही नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या नोटांमध्ये पेनाने काही तरी लिहिलेल्या व अन्य खराब नोटांचा समावेश आहे.
नोटा तपासून घ्या
बँक व एटीएममधून मिळालेल्या नोटा चांगल्या पद्धतीने तपासून घ्या. एटीएममधून बरेचदा पेनाने काही तरी लिहिलेल्या, फाटलेल्या व मळकट नोटा मिळतात. अशा नोटा डिपॉझिट मशीन स्वीकारत नाही. सहज शक्य असल्यास नोटांवर लिहिलेले मिटविण्याचा प्रयत्न करा.
नोटांवर का लिहितात कर्मचारी
चौकशीनंतर मिळालेल्या माहितीनुसार, बँक कर्मचारी १०० नोटांचे गठ्ठे तयार करतात. त्यामुळे ते वरच्या नोटेवर एकूण आकडा लिहून ठेवतात. गरज संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नोटांवर लिहिलेले मिटविले पाहिजे, असा नियम आहे. परंतु, कर्मचारी काही कारणांमुळे असे करीत नाहीत. त्याचे नुकसान ग्राहकांना सहन करावे लागते.
व्यापाऱ्यांनाही लिहिण्याची सवय
व्यापाऱ्यांनाही नोटांवर लिहिण्याची सवय असते. व्यापारी अशा नोटा बँकेत जमा करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना समज दिली जाते. परंतु, परिस्थितीत फारसा बदल घडलेला नाही.
ग्राहक वारंवार प्रयत्न करतात
१०-१२ हजार रुपये जमा करायचे असल्यास बहुतेक नोटा मशीनद्वारे स्वीकारल्या जात नाहीत. त्यानंतर त्या नोटा परत परत मशीनमध्ये टाकाव्या लागतात. वारंवार प्रयत्न केल्यानंतर काही नोटा स्वीकारल्या जातात. परंतु, जास्तीतजास्त नोटा परत मिळतात. यात ग्राहकांचा वेळ वाया जातो.