विलिनीकरणाच्या विरोधातनागपुरात बँक कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:05 AM2019-10-23T00:05:10+5:302019-10-23T00:06:13+5:30
ऑल इंडिया बॅक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त आवाहनानुसार देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एकदिवसीय बंद पुकारला होता. यात नागपुरातील बँक कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑल इंडिया बॅक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त आवाहनानुसार देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एकदिवसीय बंद पुकारला होता. यात नागपुरातील बँक कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. यामुळे अनेक बँकांमधील कामकाज प्रभावित झाले.
बँकांचे विलिनीकरण आणि सरकारच्या धोरणांविरोधात या एकदिवसीय संपाचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भात असणाऱ्या बँकांमधील सुमारे ७०० कर्मचाऱ्यांनी किंग्जवे येथील बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर एकत्र येऊन निदर्शने केली.
असोसिएशनचे महासचिव जयवंत गुरवे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी ईएमबीएचे अध्यक्ष सुरेश बोभाटे म्हणाले, बँकांच्या विलिनीकरणाचा भविष्यात काय धोका आहे, यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांना पटवून द्यावे. कर्ज बुडविणाऱ्यांविरोधात कायदा करावा, असे आग्रही मत त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून मांडले. शिक्षक नेते डॉ. युगल रायलू म्हणाले, सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी हा संघर्ष आहे. त्यामुळे सर्वांनी सोबत राहावे. बेफी(बीइएफआय)चे महासचिव बी.बी. असाई आणि आयबाक(एआयबीओसी)चे महाराष्ट्र झोन अध्यक्ष अनिल कापडिया, जगदीशन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आंदोलनादरम्यान मिलिंद वासनिक, व्ही. अय्यर, अंजली राणा, एल. पी. नंदनवार, प्रभात कोकास, प्रदीप गौर, आर.पी. राव, श्रीकृष्ण चेंडके, नरेंद्र भुजाडे, अशोक शेंडे, रामकृष्ण राय आदीसह विदर्भभरातून आलेले अनेक कर्मचारी उपस्थित होते.