कर्जाच्या नावावर बँकेला २.३१ कोटींचा गंडा
By admin | Published: August 4, 2016 02:01 AM2016-08-04T02:01:23+5:302016-08-04T02:01:23+5:30
दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेवून बोगस दस्ताऐवजाच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखाचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नागपूर : दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेवून बोगस दस्ताऐवजाच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखाचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी या प्रकरणी बँकेचे वकील आणि मूल्यांककासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गणपत महादेव ढोके (आदर्श नगर), राजू माणिकराव चिंचखेड़े (श्रीशरण नगर, खामला), विकास रामकृष्ण भुते (म्हाळगी नगर), चंद्रप्रभा मनोहर सोनवणे (भोलेबाबा नगर, पिपला), मुकेश ध्रुव कुमार मेश्राम व हिमानी शालिकराम मेश्राम, सतीश प्रभुदास डोंगरे (भगवान नगर), दिवाकर मारुती मेश्राम व आशा दिवाकर मेश्राम (जवाहर नगर, भंडारा), राकेश प्रसाद उदयराज शाहु व सोनी राकेश प्रसाद शाहु (बेसा मार्ग), इर्गेश नत्थूजी मथलोन, (वाठोड़ा), समीर मनोहर वानखेडे व हेमराज राजू वानखेड़े (अंबा नगर, उमरेड मार्ग), मीना मधुकर वानखेड़े, मधुकर महादेव वानखेड़े (हावरापेठ), वकील ए.ए. काशीकर तथा मूल्यांकक मुंडले अशी आरोपींची नावे आहेत. कळमना पारडी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे. पोलीस सूत्रानुसार आरोपींनी या बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. नियमानुसार बँकेने वकील आणि मूल्यांककाच्या माध्यमातून दस्ताऐवजांची तपासणी केली. आरोपींनी दुसऱ्यांची संपत्ती स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगून ती संपत्ती बँकेत गहाण ठेवली. त्या संपत्तीचे बोगस दस्ताऐवज सुद्धा त्यांनी बँकेत सादर केले. २००८ पासून हा प्रकार सुरू होता. गेल्या मार्चमध्ये बँकेला याबाबत समजले. बँकेने प्रकरणाचा आपल्या स्तरावर चौकशी केली तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी बँकेतून २ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयाची फसवणूक केली. काही आरोपी बँकेची किस्त सुद्धा वेळवर भरत नव्हते. बँक व्यवस्थापक हरीश जरगर यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणुकीचे हे प्रकरण अतिशय मोठे असल्याने आर्थिक शाखेकडे त्याचा तपास सोपविण्यात आला आहे. यात काही आरोपी शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगितले जात आहे. गुन्हा दाखल झाल्याने आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)