बँक घोटाळा : अशोक धवड यांचा जामीन अर्ज खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 06:58 PM2020-05-27T18:58:39+5:302020-05-27T19:00:36+5:30

नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले बँकेचे माजी अध्यक्ष अशोक धवड यांचा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने खारीज केला. न्या. व्ही. एम. वैद्य यांनी धवड यांना हा दणका दिला.

Bank scam: Ashok Dhavad's bail application rejected | बँक घोटाळा : अशोक धवड यांचा जामीन अर्ज खारीज

बँक घोटाळा : अशोक धवड यांचा जामीन अर्ज खारीज

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : कोरोनाच्या आधारावर दिलासा देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले बँकेचे माजी अध्यक्ष अशोक धवड यांचा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने खारीज केला. न्या. व्ही. एम. वैद्य यांनी धवड यांना हा दणका दिला.
माजी आमदार धवड गेल्या ११ महिन्यापासून गजाआड आहेत. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्य व कारागृहात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेता जामीन देण्याची विनंती केली होती. धवड ६३ वर्षे वयाचे असून आरोग्य अस्वास्थ्यामुळे त्यांना नियमित उपचाराची गरज आहे. तसेच, कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे त्यांना कारागृहात धोका आहे. याशिवाय प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे धवड यांना कारागृहात ठेवण्याची गरज नाही, असा दावा अर्जात करण्यात आला होता. परंतु, न्यायालयाने ठेवीदारांचे हित व घोटाळ्याची गंभीरता लक्षात घेता धवड यांच्यावर दया दाखविण्यास नकार दिला. राज्य सरकार व कारागृह प्रशासन बंदिवानांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करीत आहे. तसेच, अशा प्रकरणांवर शक्यतांच्या आधारावर नाही तर, गुणवत्ता तपासून निर्णय घ्यावा लागतो असे निरीक्षण न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले.
या प्रकरणात धवड व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-ए, एमपीआयडी कायद्यातील कलम ३ व आयटी कायद्यातील कलम ६५ व ६५ (ब) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी बँकेमध्ये ३८.७५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. यापूर्वी धवड यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. परंतु, त्यांना कुठेच दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आत्मसमर्पण करावे लागले. धवडतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Bank scam: Ashok Dhavad's bail application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.