बँकेत घुसलेला चोर पकडला

By admin | Published: June 15, 2017 02:26 AM2017-06-15T02:26:51+5:302017-06-15T02:26:51+5:30

बँक दरोडा किंवा मोठ्या घातपाताची तात्काळ सूचना देणाऱ्या ‘आॅटो डायलर सिस्टीम’मुळे एका बँकेत घुसलेला चोर रंगेहात पोलिसांच्या हाती लागला.

Bank seized the thief | बँकेत घुसलेला चोर पकडला

बँकेत घुसलेला चोर पकडला

Next

गाझियाबाद बँक दरोड्याची पुनरावृत्ती टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँक दरोडा किंवा मोठ्या घातपाताची तात्काळ सूचना देणाऱ्या ‘आॅटो डायलर सिस्टीम’मुळे एका बँकेत घुसलेला चोर रंगेहात पोलिसांच्या हाती लागला. त्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील पंजाब नॅशनल बँकेतील मोठ्या दरोड्याची पुनरावृत्तीही टळली.
बँकेत घुसून चोरीच्या प्रयत्नाची ही घटना बुधवारच्या पहाटे २.३० वाजताच्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रसेन चौकातील वडेभवनच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या युनायटेड बँक आॅफ इंडिया येथे घडली. सागर हरिहर मेंढे (२२), असे या चोराचे नाव असून तो तीन नल चौकनजीकच्या देवगरपुरा येथील रहिवासी आहे. तो अभियंता असल्याचे बोलले जाते. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता बँक बंद झाल्यानंतर सहायक व्यवस्थापक प्रज्ञा सुरेंद्रकुमार बोरकर रा. बँक कॉलनी जरीपटका यांनी स्वत: बँकेला कुलूप लावले होते. चाव्या घेऊन त्या आपल्या घरी गेल्या होत्या. बँकेच्या शटरची दोन्ही कुलपे आणि चॅनल गेटचे कुलूप तोडून चोर बँकेत घुसताच सायरन जोरजोराने वाजू लागले होते. चोर घुसल्याची किंवा घातपाताची सूचना देणारे ‘आॅटो डायलर सिस्टीम’ या बँकेत बसवण्यात आलेले आहे. बँकेत चोर घुसताच या सिस्टीमने बँकेचे वरिष्ठ प्रबंधक गोपाबंधू करण यांना त्यांच्या मोबाईलवर धोक्याची सूचना दिली. त्याचबरोबर पोलीस नियंत्रण कक्षालाही या बँकेत काही तरी मोठी घटना घडत असल्याची सूचना याच सिस्टीमद्वारे पोलीस नियंत्रण कक्षालाही मिळाली. गोपाबंधू करण हे बाहेरगावी असल्याने त्यांनी प्रज्ञा बोरकर यांना बँकेत सायरन वाजत असल्याची सूचना दिली. बोरकर यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांना सूचना दिली. त्या बँकेत येताच बँकेसमोर त्यांना प्रचंड पोलीस ताफा आणि लोकांची गर्दी दिसली. बँकेची सर्व कुलपे तुटलेली दिसली. पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांनी बँकेच्या आत जाऊन पाहिले असता सर्व लॉकर व्यवस्थित दिसले. पोलिसांनी बँक इमारतीची झडती घेतली असता त्यांना बँकेच्या समोरील जिन्याजवळील संडासमध्ये एक इसम लपलेला दिसला. लागलीच त्याला पकडण्यात आले. या चोराजवळ काळ्या रंगाची कॉलेज बॅग होती. बॅगेत लोखंडी आरी, एक हातोडा, सिगारेटचे पाकीट, लायटर, मोबाईल, नेव्ही ब्ल्यू रंगाचा रेनकोट, पांढऱ्या रंगाचा स्कार्फ आणि शर्ट होता. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यांना रेन कोट घातलेला, तोंडाला स्कार्फ बांधलेला आणि पाठीवर कॉलेज बॅग असलेला एक इसम दिसून आला. तो हा पकडलेला चोरच होता.या चोराला गणेशपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
१२ जून रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील पंजाब नॅशनल बँकेत चोरांनी घुसून ३० लॉकरमधील कोट्यवधी रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. युनायटेड बँक आॅफ इंडियामध्ये ‘आॅटो डायलर सिस्टीम’ नसती तर गाझियाबाद घटनेची पुनरावृत्ती घडली असती, असे बोलले जात आहे.

Web Title: Bank seized the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.