आपले सरकार सेवा केंद्रात आता बँकिंग सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 08:41 PM2020-04-22T20:41:34+5:302020-04-22T20:44:03+5:30
ग्रामस्थांना पैशाची गरज पडल्यास गावातून तालुक्यात जाणे टाळण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा लाभ गावातील जनधन योजनेचे खातेदार, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी घेत आहे. सेतू केंद्रात जाऊन आपल्या बँक खात्यातील रक्कम काढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने अख्खा देश लॉकडाऊन केला आहे. प्रवासी वाहतुकीच्या सेवा ठप्प आहेत. दुचाकीवर बाहेर पडल्यास पोलिसांचे फटके खावे लागत आहेत. अशात ग्रामस्थांना पैशाची गरज पडल्यास गावातून तालुक्यात जाणे टाळण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा लाभ गावातील जनधन योजनेचे खातेदार, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी घेत आहे. सेतू केंद्रात जाऊन आपल्या बँक खात्यातील रक्कम काढत आहे.
लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीण भागातील बँकांमध्ये नागरिकांची पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. मात्र आपले सरकार सेवा केंद्रात सरकारच्या नियमांचे पालन करून गर्दी टाळण्यात येत आहे. शिवाय सोशल डिस्टंसिंगचे पालनही करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेतील रक्कम काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. परंतु आता लॉकडाऊनमुळे वाहने व इतर वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात आल्याने हेही करणे शक्य नाही. त्यामुळे अशा ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या राहत्या गावीच ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्राचे संगणक परिचालक बँकिंग सुविधा देत, ग्रामस्थांना तेथेच पैसे उपलब्ध करून देत आहेत.
नागपूर जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांतर्गत एकूण ७६८ ग्रामपंचायती असून, १५ लाखावर नागरिक येथे वास्तव्यास आहेत. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक किशोर पठाडे यांच्या नेतृत्वात सुमारे ४०० वर ग्रा.पं.मध्ये नागरिकांना आपले सेवा केंद्रामार्फत डिजिपेच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
वीज बिलाचा भरणा व इतरही डिजिटल सेवा उपलब्ध
विशेष म्हणजे, अनेक केंद्रावर तर नागरिकांना बँकिंग सुविधेसोबत वीज बिलाचा भरणा व इतर डिजिटल सेवाही उपलब्ध करुन दिल्या जात आहे. नागपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या दवलामेटी येथील आपले सरकार सेवा केंद्र चालक मोहन शेंदरे यांनी जनधन योजनेच्या लाभार्थ्यांना आजवर १ लाख ५७ हजारावरील रक्कम या केंद्रामार्फतच वितरित केली आहे. नागरिकांना घरच्या घरीच लॉकडाऊनच्या काळात पैसे उपलब्ध होत असल्याने त्यांच्याकडून याला पसंतीही दिली जात आहे.