बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून कर्जपुरवठा करावा : अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 08:08 PM2019-06-28T20:08:00+5:302019-06-28T20:08:58+5:30
खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली असून बी-बियाणे, खते आदीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून प्रत्येक गावात कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुलभपणे कर्जपुरवठा करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली असून बी-बियाणे, खते आदीसाठी शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून प्रत्येक गावात कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुलभपणे कर्जपुरवठा करुन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बचत भवन सभागृहात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा यासंदर्भात विविध बँकांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक प्रबंधक डी. के. सिंह, नाबार्डच्या जिल्हा विकास प्रबंधक मैथिली कोवे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू आदी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९७९ कोटी रुपये कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी विविध बँकांनी २४ हजार ९५३ शेतकऱ्यांना ७७५ कोटी ८० लक्ष रुपयांचा कर्जपुरवठा पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पेरणीपूर्वी कर्ज कसे उपलब्ध करुन देण्यात येईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी १०६६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यापैकी २० हजार ७६५ शेतकऱ्यांना २६० कोटी ६५ लक्ष रुपयांचे म्हणजे १९ टक्के कर्जपुरवठा झाला होता. परंतु यावर्षी विविध बँकांनी आतापर्यंत २८ टक्के कर्जपुरवठा केलेला आहे. कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ३४ कोटी ९ लक्ष (४२ टक्के), बँक ऑफ इंडिया ८१ कोटी १० लक्ष (४० टक्के), बँक ऑफ बडोदा २२ कोटी ४७ लक्ष (३५ टक्के), पंजाब नॅशनल बँक १८ कोटी ९३ लक्ष (३७ टक्के), एचडीएफसी बँक १२ कोटी ९४ लक्ष (३० टक्के) तर आयडीबीआय बँक २ कोटी ८० लक्ष (२९ टक्के) यांचा समावेश आहे.
कमी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये युको बँक व सेंट्रल बँक १६ टक्के, स्टेट बँक १३ टक्के, युनियन बँक ७ टक्के तर अलाहाबाद बँक ९ टक्के एवढा कर्जपुरवठा केला असून या बँकांनी खरीप हंगामात कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिल्या.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३५ कोटी रुपयांचे म्हणजेच ३५ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले असून बँकेने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करणे अपेक्षित आहे. ग्रामीण बँकांनी ८ कोटी ७९ लक्ष म्हणजेच ३८ टक्के कर्जपुरवठा केला असल्याचेही यावेळी सांगितले. शासनाने कर्जमाफी दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा केला आहे. जिल्ह्यात ७० हजार १५६ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ५२ लक्ष रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते जिल्ह्याचा पत आराखडा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. प्रारंभी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शरद बारापात्रे यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या कर्जपुरवठ्यासंदर्भात माहिती दिली.