विलिनीकरणाविरोधात आज बँकांचा राष्ट्रव्यापी संप
By Admin | Published: January 8, 2016 03:38 AM2016-01-08T03:38:56+5:302016-01-08T03:38:56+5:30
स्टेट बँकेशी संलग्न पाच बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) ...
पाच लाख कर्मचारी संपावर : बँकिंग व्यवहार ठप्प होणार
नागपूर : स्टेट बँकेशी संलग्न पाच बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) ८ जानेवारीला एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. संपानंतर शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे.
संपात २६ राष्ट्रीयकृत बँकांमधील ‘एआयबीईए’चे कर्मचारी सहभागी होणार असल्यामुळे बहुतांश बँकांचे व्यवहार ठप्प राहतील. संघटनेच्या सभासदांची संख्या स्टेट बँकेत कमी असल्यामुळे बँकेचे व्यवहार शुक्रवारी सुरू राहण्याची शक्यता आहे. संपात सहकारी आणि ग्रामीण बँका सहभागी होणार नाहीत. स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ पटियाळा, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अॅण्ड जयपूर या स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या पाच बँकांचे स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. या बँकांवर सेवा शर्ती लागू करणे हे इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या संघटनादरम्यान झालेल्या कराराचे उल्लंघन असल्याचा आरोप ‘एआयबीईए’चे पूर्व महाराष्ट्र विभागाचे महासचिव बीएनजे शर्मा यांनी लोकमतशी बोलताना केला. संपात ‘एआयबीईए’चे ५ लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याचे शर्मा म्हणाले.
शर्मा यांनी सांगितले की, स्टेट बँकेत लागू असलेली ‘करिअर प्रोग्रेसिव्ह स्कीम’ संलग्न बँकांमध्ये लागू करण्यास इंडियन बँक्स असोसिएशन आग्रही आहे. या योजनेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास जास्त आहेत.
याशिवाय या बँकांमध्ये सरकारच्या आदेशानंतरही नवीन आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती बंद आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्याचा बँकेच्या व्यवस्थापनाने कट रचला आहे. यापूर्वी संघटनेने ४ जून २०१५ रोजी संप पुकारला होता. तसेच १ व २ डिसेंबरला पुकारलेला संप चर्चेनंतर परत घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)
बँकांचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प होणार
राष्ट्रीयकृत २६ बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने नागपुरात कोट्यवधींचे बँकिंग व्यवहार ठप्प राहतील. त्यामुळे ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल.
स्टेट बँकेसमोर आज निदर्शने
संपादरम्यान ८ रोजी सकाळी ११ वाजता किंग्जवे येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी सेंट्रल एव्हेन्यू येथील स्टेट बँक आॅफ त्रावणकोर बँकेसमोर निदर्शने करण्यात आली.