आंबे पिकविण्यासाठी अजूनही होतोय प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग !
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 6, 2024 08:27 PM2024-06-06T20:27:35+5:302024-06-06T20:27:47+5:30
रसायनाने पिकलेले आंबे आरोग्यासाठी घातक : सरकारची एथिलीन रिपनरच्या वापराला परवानगी
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) संथ कारवाईमुळे यंदाच्या हंगामात कळमन्यातील फळे व्यापारी आंबे पिकविण्याठी प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइड रसायनाचा सर्रास उपयोग करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) तीन वर्षांआधी अधिसूचना काढून फळे पिकविण्यासाठी एथिलीन रिपनर रसायनाच्या वापराला अधिकृत परवानगी दिली आहे. या रसायनाने आंबे उशिरा पिकतात. त्यामुळेच झटपट नफा कमविण्यासाठी पर्याय म्हणून कळमन्यातील व्यापारी पुन्हा प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडकडे वळले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने कळमन्यात या रसायनाचा सर्रास उपयोग होत असल्याचे व्यापाऱ्यांनी खासगीत सांगितले. दुसरीकडे कॅल्शियम कार्बाइड रसायनाचा उपयोग आता बंद झाल्याचे एफडीएच्या अधिकारी सांगतात. अर्थपूर्ण व्यवहारामुळे व्यापाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा ग्राहक पंचायतचा आरोप आहे.
एथिलीन रिपनरने दोन दिवसातच पिकतात आंबे
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधिसूचनेनंतर फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडऐवजी एथिलीन रिपनर रसायनाचा उपयोग होऊ लागला. या रसायनाने दोन दिवसातच आंबे पिकतात. पाऊच स्वरुपात चीन देशातून आलेले हे रसायन ओले करून आंब्याच्या पेटीत ठेवतात. या रसायनाचा आरोग्यावर परिणाम होत नसल्याचे सरकारचे मत आहे. पण सरकारचा दावा खरा नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. व्यापारी नफा कमविण्यासाठी आधीही प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग करायचे. आता त्याऐवजी सरकारमान्य दुसरे रसायन आले आहे. शेवटी मानवी आरोग्याशी खेळ होतोच.
केवळ दोन पाऊचने आंब्याची पेटी पिवळीधम्म
सध्या आंब्याचा हंगाम आहे. सर्वच प्रकारचे आंबे कळमन्यात विक्रीसाठी येत आहेत. सध्या आवक वाढली आहे. त्यामुळे आंबे पिकविण्यासाठी रसायनाचा उपयोग होत आहे. याआधीही विकलेले आंबे कोणत्या रसायनाने पिकविले होते, याची माहिती विभागाकडे नाही. शिवाय किती कारवाऱ्या झाल्या, याचीही नोंद नाही. या रसायनाबाबत अधिकारी अनभिज्ञ आहेत. पिकलेल्या आंब्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यास आंब्यात रसायन असल्याचे निष्पन्न होत नाही. त्यामुळे ग्राहकांनीच आंबे जपून खावेत, असा सल्ला ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.