विदेशी विद्यापीठांना बाेलावणे हे ‘आत्मनिर्भर भारत’ विराेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2023 08:00 AM2023-01-22T08:00:00+5:302023-01-22T08:00:07+5:30
Nagpur News आत्मनिर्भर भारताचे ध्येय बाळगतांना परदेशी विद्यापीठांसाठी पायघड्या घालणे, हे विराेधाभासी आहे, अशी टीका पंजाब विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. एस. के. कुळकर्णी यांनी केली.
निशांत वानखेडे
नागपूर : सरकारच्या नव्या शिक्षण धाेरणानुसार पाश्चात्य देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांना भारतात पाचारण करण्यात येणार आहे, तशी ही संकल्पना नवीन नाही. १९९० मध्ये वैश्विकरणाच्या धाेरणात असा प्रयत्न झाला हाेता; पण ताे फसला. मात्र, आत्मनिर्भर भारताचे ध्येय बाळगतांना परदेशी विद्यापीठांसाठी पायघड्या घालणे, हे विराेधाभासी आहे, अशी टीका पंजाब विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. एस. के. कुळकर्णी यांनी केली.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काॅंग्रेसमध्ये सहभागी झालेल्या डाॅ. कुळकर्णी यांनी एका सत्रात राष्ट्रीय शिक्षण धाेरण-२०२० च्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित केली. परदेशी विद्यापीठांसाठी ‘रेड कार्पेट’ टाकले असले तरी त्या येतील की नाही, यात शंका आहे. दुसरे म्हणजे भारतातील ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे, ते आजही या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यास जातात. मग या विद्यापीठांना भारतात बाेलावण्याची गरज काय? उलट देशातील विद्यापीठांचे इन्फ्रास्ट्रक्चर परदेशी विद्यापीठांप्रमाणे करणे अधिक साेईस्कर हाेईल, असे मत त्यांनी मांडले.
याशिवाय नव्या धाेरणानुसार २०३० पर्यंत ठरविलेले उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय वाटते. धाेरण लागू करून तीन वर्षे लाेटूनही गेले आहेत आणि अद्याप त्याची अंमलबजावणीच सुरू झाली नाही. निधीच्या नियाेजनासाठी ‘नॅशनल फंडिंग एजन्सी’ची अद्याप स्थापना झाली नाही. पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणूका हाेतील. त्यामुळे धाेरणाची कारवाई पुन्हा रखडेल. नव्या धाेरणाने चमत्कार घडेल, असे भासवले जात असले तरी सत्य फार वेगळे आहे. डाॅ. कुळकर्णी यांनी काॅलेज आणि विद्यापीठांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’ समितीमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले. नवे शिक्षण धाेरण फार्मसी काॅलेज व विद्यापीठांसाठी धाेकादायक असल्याचे सांगत विद्यापीठाचे कुलगुरू, प्राचार्य, फार्मसी काॅन्सिलचे पदाधिकारी गप्प असल्याचे आश्चर्य त्यांनी व्यक्त केले. १९५३ मध्ये पहिले शिक्षण धाेरण ठरविताना पं. जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करीत याेग्य अंमलबजावणीशिवाय शिक्षणाचे उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले.
नव्या धाेरणाने क्रांती घडेल : डाॅ. येवले
या सत्रात डाॅ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रमाेद येवले यांनी नवे शिक्षण धाेरण देशात शैक्षणिक प्रगतीसाठी क्रांती ठरेल, असे मत व्यक्त केले. पूर्वी तीन वर्षांच्या मुलांचा धाेरणात समावेश नव्हता, जाे आता आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणात संशाेधन आधारित नव्या संकल्पना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, ५०० विद्यापीठ व ४५ हजार महाविद्यालयांची नाेंदणी झाली आहे. अनेक महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळेल. पदवी अभ्यासात मुक्त प्रवेश व आवडले नाही तर साेडण्याची व दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी राहील. नवे धाेरण भारतीयत्वाचा बाेध करणारे राहील, असा दावा डाॅ. येवले यांनी केला.