बाप्पा, हे निर्बुध्दच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:34 AM2017-09-07T01:34:31+5:302017-09-07T01:37:53+5:30

भाविकांनी वाजत-गाजत बाप्पांना घरी आणले...फुलांची आरास सजवून अतिशय स्वच्छतेत त्यांची मनोभावे पूजा केली...बुद्धीची देवता म्हणून रोज सकाळ-संध्याकाळ आरतीही गायली...परंतु बाप्पांना निरोप द्यायच्या वेळी मात्र हे भाविक नेमके निर्बुध्द झाले

Bappa, that's unintentional! | बाप्पा, हे निर्बुध्दच!

बाप्पा, हे निर्बुध्दच!

googlenewsNext
ठळक मुद्देफुटाळा आणि नाईक तलावाचे प्रचंड नुकसाननिर्माल्य, लाकडाच्या पाट्या, नारळ,प्लास्टिकच्या पिशव्याही टाकल्या पाण्यातअनेकांनी स्वयंसेवकांशी घातला वाद

नागपूर : भाविकांनी वाजत-गाजत बाप्पांना घरी आणले...फुलांची आरास सजवून अतिशय स्वच्छतेत त्यांची मनोभावे पूजा केली...बुद्धीची देवता म्हणून रोज सकाळ-संध्याकाळ आरतीही गायली...परंतु बाप्पांना निरोप द्यायच्या वेळी मात्र हे भाविक नेमके निर्बुध्द झाले आणि १० दिवसांचे निर्माल्य, मूर्ती ठेवलेल्या लाकडाच्या पाट्या, नारळ, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या अशा जलप्रदूषणाला कारणीभूत ठरणाºया सर्व गोष्टी त्यांनी बाप्पांसह पाण्यात विसर्जित केल्या. परंतु पर्यावरणाचे नुकसान करतांना आपण अप्रत्यक्षपणे आपलेच जीवन संकटात टाकत आहोत, अशी सद्बुद्धी त्यांना एका क्षणालाही सुचली नाही. याचा अर्थ बुद्धीची देवता असलेल्या बाप्पांचा या भाविकांच्या घरातील मुक्कामही व्यर्थच ठरला. गणेश विसर्जनासाठी मंगळवारी भाविकांनी फुटाळा तलावावर एकच गर्दी केली. यात अनेकांनी सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्ती, १० दिवसांत गोळा झालेले निर्माल्य तलावात टाकल्यामुळे तलावात सर्वत्र कचरा साचल्याचे दृश्य बुधवारी चौफेर दिसत होते. भाविकांनी निर्माल्य तलावात टाकू नये यासाठी महानगरपालिकेने फुटाळा तलावाच्या दोन्ही बाजूला मोठ्या कुंड्यांची व्यवस्था केली होती. परंतु तरीही अनेकांनी तलावातच निर्माल्य टाकले. नाईक तलावातही हीच स्थिती पाहावयास मिळाली. येथेही भाविकांनी गणेशमूर्तीसोबत निर्माल्य तलावात टाकल्यामुळे तलावात सर्वत्र नुसता कचरा दिसत होता.
आवाहनाला प्रतिसाद नाही
घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने फुटाळा तलावाच्या दोन्ही बाजूला मोठे टँक उपलब्ध करून दिले होते. दोन्ही बाजूला महापालिकेचे २५ कर्मचारी दोन पाळीत ड्युटीवर तैनात होते. त्यांनी घरगुती गणेश विसर्जनासाठी येणाºया भाविकांना कृत्रिम टँकमध्ये गणेशमूर्ती आणि निर्माल्य कुंडीत टाकण्याचे आवाहन केले. परंतु भाविकांनी त्याला प्रतिसाद न देता तलावातच मूर्तीचे आणि निर्माल्याचे विसर्जन केल्याचे दिसत होते.
पाणी झाले गढूळ
भाविकांनी फुटाळा आणि नाईक तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे तलावातील पाणी गढूळ झाल्याचे दिसत होते. तलावाच्या काठावर निर्माल्य, प्लास्टिक, नारळ तरंगत होते. बुधवारीही तलावावर विसर्जन सुरू होते. महापालिकेतर्फे ठेवण्यात आलेल्या टँकमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी भाविक तलावातच मूर्तींचे विसर्जन करताना आढळले. मंगळवारी आवाहनाला प्रतिसाद देत २,७०० भाविकांनी कृत्रिम तलावात विसर्जन केले. परंतु अनेक भाविकांनी तलावातच विसर्जन केल्यामुळे तलावातील पाणी गढूळ झाल्याचे तेथील कर्मचाºयांनी सांगितले.

Web Title: Bappa, that's unintentional!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.