बाप्पा निघाले...आज थाटात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:25 AM2017-09-05T00:25:18+5:302017-09-05T00:25:55+5:30

गणपती आले आणि बघता-बघता ११ दिवसही पूर्ण झाले. घरगुती गणपतीचे दीड, पाच आणि सातव्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बहुतांश गणपतीचे विसर्जन होणार आहे.

Bappa was out ... today's immersion | बाप्पा निघाले...आज थाटात विसर्जन

बाप्पा निघाले...आज थाटात विसर्जन

Next
ठळक मुद्देविसर्जन बंदोबस्तासाठी चार हजार पोलीस : १० ठिकाणांवर विसर्जन व्यवस्था, एसआरपी आणि होमगार्डचाही सहभाग, सीसीटीव्हीची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणपती आले आणि बघता-बघता ११ दिवसही पूर्ण झाले. घरगुती गणपतीचे दीड, पाच आणि सातव्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बहुतांश गणपतीचे विसर्जन होणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाय पोलीस विभागाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ढोल-ताशांच्या निनादात गणरायाला निरोप द्यायला सोमवारी रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे.
गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी सहा पोलीस उपायुक्त आणि सहा सहायक आयुक्तांसह चार हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. खबरदारीच्या उपाययोजना करतानाच एकूण १० ठिकाणांवर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी उपस्थित होते.
यावर्षी शहरात एकूण १०६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली असून, अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. सोमवारी ४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या विसर्जनाला सुरुवात केली आहे. या मंडळांनी पोलीस परवानगी घेताना विसर्जनाची तारीख, मार्ग आणि ठिकाण ठरवून दिले होते. त्यानुसार ४ सप्टेंबरला ३४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पार पडणार असून, मंगळवारी ५ सप्टेंबरला सर्वाधिक ६४९ मंडळांतर्फे श्रींच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. बुधवारी ६ सप्टेंबरला ३६९ तर गुरुवारी १७ सार्वजनिक मंडळांकडून बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनाच्या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड, गोंधळ होणार नाही, याची पोलिसांनी खास काळजी घेतली असून, बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सार्वजनिक आणि घरगुती मूर्र्तींच्या विसर्जन मिरवणुकीत तालवाद्य वाजवायची परवानगी असली तरी मर्यादित आवाजातच ते वाजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डीजेला परवानगी नाही, याचा पुनरुच्चार करून शांततेत आणि ठरवून दिलेल्या वेळेत सार्वजनिक मंडळांनी विसर्जन करावे, असे सहआयुक्त बोडखे यांनी सांगितले. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विसर्जनाच्या ठिकाणांपासून वाहतूक व्यवस्था वळविण्यात आली आहे.
विसर्जनाचे ठिकाण
फुटाळा तलाव, सोनेगाव तलाव, नाईक तलाव, कोराडी तलाव, गांधीसागर तलाव, सक्करदरा तलाव, कळमना तलाव, महादेव घाट आणि वेणा नदी हिंगणा. विशेष म्हणजे, या सर्व ठिकाणांवर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. घरगुती गणेश मूर्तींचे येथे विसर्जन करण्याचे सुचविण्यात आले आहे.
मनपा प्रशासन सज्ज,१९४ कृत्रिम तलाव
गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. तलावाच्या ठिकाणी व शहरातील विविध भागात कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल यांनी सोमवारी शहरातील तलाव व विसर्जन स्थळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. फुटाळा, गांधीसागर व सक्करदरा, अंबाझरी, सोनेगाव तलावाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी सुधाकर कोहळे, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, राजू भिवगडे उपस्थित होते.
१२०० कर्मचारी तैनात
अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक सज्ज केले आहेत. विदर्भ सर्पमित्र मंडळ व रिव्हॉन या संस्थेचे ४० जलतरणपटू फुटाळा तलाव व गांधीसागर तलाव येथे कार्यरत आहेत. याशिवाय महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे १००० तर अग्निशमन विभागाचे २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Bappa was out ... today's immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.