रक्तबंबाळ बापूंची अडीच किलोमीटर पायपीट

By admin | Published: October 26, 2015 11:12 PM2015-10-26T23:12:11+5:302015-10-27T00:23:26+5:30

कळसरीच्या रानातून... : सांबरवाडीजवळ तांबट, गेळा, तोरणांच्या पानांवर रक्ताचं शिंपण; बिबट्याने उडवला थरकाप --आॅन दि स्पॉट

Bapu's two-and-a-half kilometer walk | रक्तबंबाळ बापूंची अडीच किलोमीटर पायपीट

रक्तबंबाळ बापूंची अडीच किलोमीटर पायपीट

Next

राजीव मुळ्ये -सातारा--पूर्वेला पाटेकर यांची पडीक जमीन, पश्चिमेला सपकाळ यांची जमीन, दक्षिणेला कडा भाग, उत्तरेला काळेश्वरी मंदिर... ओल्या शाईतून उतरणारी पंचनाम्याची कोरडी भाषा अन् साक्षीला कड्याजवळून तोडून आणलेल्या ओल्या पानांवरचं सुकलेलं रक्त. गणपत अण्णा भणगे ऊर्फ बापूंचं! बिबट्याच्या तीक्ष्ण नखांनी ओरबाडून काढलेलं...
वयाच्या सत्तरीत हातातला विळा गवतावर सपासप चालवत असताना सांबरवाडीच्या बापूंवर रविवारी बिबट्याने हल्ला केला. गोठ्यातल्या गुरांची गरज बापूंना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कड्याकडे घेऊन गेली आणि घात झाला. गावाला बिबट्याचं दर्शन नवीन नाही; पण गंभीर जखमी अवस्थेत बापू ज्या हिकमतीनं अन् चिकाटीनं गावापर्यंत पोहोचले, ती शहरी मंडळींसाठी निश्चितच नवीन आहे. गावापासून काळसरीच्या रानाचं अंतर आहे अडीच किलोमीटर. गावापासून तीव्र चढण चढून थोडं वर गेल्यावर लाल मातीनं व्यापलेला सडा. पुरुषभर उंच गवतातून जाणारी पाऊलवाट मध्येच लुप्त होणारी. गवतात कोणताही वन्यप्राणी दबा धरून बसला असेल, तरी दिसू शकत नाही, अशी स्थिती. भूमिपुत्रांची काळजी वाहणाऱ्या काळेश्वरीच्या मंदिरापासून पुन्हा चढण. थेट काळ्या कड्यापर्यंत. याच परिसराचं नाव ‘काळसरीचं रान’... काळेश्वरी देवीवरून पडलेलं!
साताऱ्याचे वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे, वनपाल सुनील भोसले, वनरक्षक प्रशांत पडवळ, दीपक गायकवाड, नीलेश रजपूत, मारुती माने सोमवारी सकाळी काळसरीकडे धावले. सांबरवाडीचे सरपंच संतोष भोसले, पोलीस पाटील संपत भोसले, लक्ष्मण भणगे, रमेश ढवळे, मनोहर सावंत, किरण भणगे, सुनील भणगे, हणमंत फडतरे, शंकर पारटे ही ग्रामस्थ मंडळी वाट दाखवायला बरोबर आलेली. मोबाइलला रेंज मिळेल तेव्हा गावात फोन करून नक्की जागा विचारत सगळे खुणेच्या झाडापर्यंत पोहोचले. शिकेकाईच्या या झाडापासून काळा कडा अगदीच जवळ. चढणीवरच्या उंच गवताच्या कुरणाजवळच करवंद, तांबट, गेळा, तोरणं अन् घाणेरीची गच्च झुडपं. याच झुडपातून बिबट्यानं बापूंवर झेप घेतली. बिबट्याशी झुंजत असताना बापूंनी मदतीसाठी केलेला धावा गावापर्यंत पोहोचूच शकला नाही. पण बापूंनी गंभीर जखमा होऊनही अडीच किलोमीटर कापून गाव गाठलंच.


बापूंवरचा धोका टळला
बापूंच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्यावरील धोका टळल्याचं जिल्हा रुग्णालयातल्या सूत्रांनी सांगितलं. देवा-धर्माची प्रचंड ओढ असलेल्या बापूंची गावकरी वाट पाहत आहेत. भजन गाण्यासाठी बापू कितीही लांब, कुणाकडेही जाऊ शकतात, असं सांगणाऱ्या लहान-थोरांना बापूंवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा धक्का बसलाय. दरम्यान, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन बापूंची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. बापूंना पाच हजार रुपयांची तातडीची मदतही देण्यात आली आहे.


भुईमुगाच्या रानात आता फक्त कुसळ
काळेश्वरी देवीच्या पठारावर पूर्वी भुईमुगाचं मोठं उत्पादन होत असे. लाल मातीत पिकलेला शेंगदाणा चवीला बदामापेक्षा सरस होता. काळ बदलला अन् गावातल्या तरुणाईनं मुंबईचा मार्ग धरला. गावात आता वयोवृद्ध, महिला आणि मुलांची संख्या अधिक. भुईमुगाच्या माळावर आता उंचच उंच कुसळाचं गवत... उशाला काळा कडा अन् कपारीत दबा धरून बसलेली मूर्तिमंत भीती!

वनखात्याची प्रबोधन मोहीम सुरू
नागरी वस्तीजवळ मुक्काम ठोकणाऱ्या बिबट्यांचा (लेपडर््स आॅफ सिव्हिल सोसायटी) प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालल्याची सूचना ‘लोकमत’ने वारंवार दिली आहे. साताऱ्याजवळील डोंगराळ गावंच नव्हे, तर शहरी भागातही बिबट्याचं दर्शन घडण्याचं प्रमाण वाढू लागलंय. तातडीने योजण्याच्या काही उपायांची चर्चा ‘लोकमत’ने सुमारे वीस दिवसांपूर्वीच केली होती. आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रबोधन आणि प्रशिक्षणासह चार महत्त्वाचे उपाय सुचविण्यात आले होते. त्या दिशेनं वनखात्याने आता ठोस वाटचाल सुरू केली असून, ‘बिबट्याप्रवण क्षेत्र’ दर्शविणारा पहिला फलक बापूंवरील हल्ल्याच्या निमित्ताने सोमवारी सांबरवाडीतच लावण्यात आला.

काळसरीच्या रानाकडून बापू रक्तबंबाळ होऊन वेगानं चालत गावाकडे निघाले होते, तेव्हा मी गायरानात होतो. बापूंना त्या अवस्थेत बघून मी विचारलं, काय झालं? पण बापू काही न बोलता वेगात गावाकडे निघून गेले. नंतर समजलं की त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केलाय.
- शिवाजी भोसले, ग्रामस्थ

Web Title: Bapu's two-and-a-half kilometer walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.